मिथिला राऊत
21/03/2025
14 मार्च 2025 रोजी होळी आणि रमजानमधील जुम्मा एकाच दिवशी आले. त्यानिमित्त उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसह विविध राज्यांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. उत्तर प्रदेशमध्ये होळीपूर्वी मशिदींना ताडपत्रीने झाकण्यात आले होते. शहाजहानपूरमध्ये सर्वाधिक 67 मशिदी झाकण्यात आल्या असून, संभळमध्ये 10 आणि बरेलीमध्ये 5 मशिदी झाकण्यात आल्या होत्या. होळीच्या पार्श्वभूमीवर, शहाजहानपूर, संभळ, जौनपूर, मिर्झापूर, ललितपूर, औरैया, लखनऊ, मुरादाबाद, रामपूर, उन्नाव, बरेली, अमरोहा आणि अयोध्या या 12 जिल्ह्यांमध्ये जुम्मा नमाजाच्या वेळेत बदल करण्यात आला होते. (Sheoran, 2025)
तसेच गुरुवारी, 6 मार्च 2025 रोजी संभळ कोतवाली पोलीस ठाण्यात होळी आणि रमजानमधील जुम्मा नमाज एकाच वेळी आल्याच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी “होळी हा वर्षातून एकदाच येणारा सण आहे, तर जुम्मा नमाज वर्षभरात 52 वेळा होतो त्यामुळे जर कोणाला होळीच्या रंगांबाबत त्रास होत असेल, तर त्यांनी त्या दिवशी घरात राहावे.” असे संभळ सर्कल अधिकारी (CO) अनुज चौधरी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. (India Today, 2025)
भाजप किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांपैकी कोणीही या विधानावर टीका केली नाही.
उलट उत्तर प्रदेशचे कामगार व रोजगार मंत्री रघुराज सिंग यांनी मंगळवारी ११ मार्च २०२५ रोजी वादग्रस्त विधान करत होळीच्या रंगांपासून वाचू इच्छिणाऱ्यांनी “हिजाब” घालावा, असे सुचवले. अलिगढमधील एका कार्यक्रमात बोलताना, त्यांनी हा सल्ला पुरुषांसाठीही दिला. ते म्हणाले की, जर कोणी आपली टोपी आणि कपडे स्वच्छ ठेवू इच्छितो, त्यांनी हिजाब घालावा किंवा घरात राहावे. (India Today, 2025) तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभळ पोलिस अधिकाऱ्यांच्या “सल्ल्याला” पाठिंबा दिल्यानंतर काही दिवसांनी, बिहारचे भाजप आमदार हरिभूषण ठाकूर यांनी सोमवारी १० मार्च २०२५ रोजी असेच आवाहन केले कि, “यावेळी होळी शुक्रवारच्या दिवशी आहे आणि ती रमजानमधील एका जुम्मासोबत येत आहे. मी त्यांना (मुस्लिमांना) आवाहन करतो की, होळीच्या दिवशी घरातच राहावे आणि आम्हाला कोणताही व्यत्यय न होता सण साजरा करू द्यावा. वर्षभरात ५२ शुक्रवार असतात, त्यामुळे ते होळीच्या एका दिवशी बाहेर पडणे टाळू शकतात.” (Singh, 2025)
देशभरात विविध ठिकाणी होळीचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला गेला. १४ मार्च रोजी धूलिवंदन देखील उत्साहात साजरे होत असल्याचे दिसले. “होळी रे होळी पुरणाची पोळी”, ‘बुरा न मानो होली है!’, असं म्हणत होळी हा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु होळी खेळणारे काही लोक या खेळाच्या इतके आहारी गेले आहेत कि, या सणाचा गाभा समजून न घेता दुर्दैवाने प्रेमाचा संदेश देणाऱ्या या सणाला हिंसेचं गालबोट लागताना दिसत आहे.
१४ मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूरमध्ये होळीच्या विशेष ‘लाट साहब’ मिरवणुकीदरम्यान तैनात पोलिसांवर कथितरित्या दगडफेक करण्यात आली. (Nagari, 2025) तसेच उत्तर प्रदेशमधील उन्नाव मध्ये होळी सणाच्या उत्सवादरम्यान होळी खेळणार्यांनी दारू पिऊन मुस्लीम घरांजवळ आल्यावर मुस्लीम समाजावर हीन शब्द वापरून टिपन्न्या केल्या त्यावर पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. (Singh S. , 2025),किती हा विरोधाभास अधिकारी चौधरी आणि भाजप नेते ठाकूर यांनी सूचना केल्याप्रमाणे मुस्लीम लोक घरात असूनही इथे पोलिसांवर होळीच्या दरम्यान दगड फेक झाली.
महाराष्ट्र मधील कोकण प्रभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातली घटना. कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 12 मार्च 2025 रोजी वार्षिक शिमगा मिरवणुकीदरम्यान काही लोकांनी मशिदीच्या गेटवर जोरदार धडक दिल्याचा दावा व्हायरल व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींनी केला. मात्र, रत्नागिरी पोलिसांनी गुरुवारी हा आरोप फेटाळून लावला, जबरदस्तीने प्रवेश झाला नसून केवळ मिरवणुकीदरम्यान आक्रमक घोषणा दिल्याचे स्पष्ट केले. कोकणातील होळीच्या पारंपरिक सन साजरा करण्याचा हा एक भाग असल्याचेही पोलिसांनी सांगितले. (The Hindu, 2025)
झारखंड मधील गिरिडीह मध्ये घडलेल्या घटने मध्ये 14 मार्च 2024 रोजी होळीच्या उत्सवादरम्यान दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष उफाळला, ज्यामुळे वाहनांना आग लावण्यात आली आणि जिल्ह्यात काही काळ अशांतता निर्माण झाली, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी ए.एन.आय वृत्तसंस्थेला दिली.(The Indian express, 2025)
आणखी एका घटनेमध्ये 25 वर्षीय हंसराज हा राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील मुलगा यु.पी.एस.सी. या परीक्षेची तयारी करीत होता.अशोक, बबलू आणि कालूराम हे तिघे त्याला रंग लावण्यासाठी ग्रंथालयात गेले असता त्याने विरोध केला, त्याचा या तिघांना राग आला म्हणून त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. (Hindustan Times, 2025) हंसराज याने अनुज चौधरी आणि उपरोक्त नमूद भाजप नेत्यांचा सल्ला ऐकून घरातच बसले पाहिजे होते ग्रंथालयात अभ्यास करण्यासाठी आला नसता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता, नाही का?
होळीच्या सणादरम्यान उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका व्यक्तीने होळी खेळण्यास नकार दिल्यामुळे त्याच्या मित्राने त्याच्यावर गोळी झाडली. जखमी व्यक्तीने आधीच अंघोळ केल्यामुळे रंग खेळण्यास नकार दिला होता.(Livemint, 2025) इथेही अनुज चौधरी आणि हरिभूषण ठाकूर यांचे ऐकून हा मुलगा घरातच बसला असता तर त्यावर गोळीबार झाला नसता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये हे सर्व तरुण मुस्लिमेतर होते, तरीही होळी हा सन एकाचा जीव घेण्यास तर एक जखमी होण्याचे कारण बनला.
सर्वसामान्यपने एखादी दुर्घटना घडण्यामध्ये दुर्बल घटकच जबाबदार असतो, असा समज समाजात पसरवला जातो किंबहुनातसा समज आहे. त्यातूनच स्त्रियांवर अत्याचार होऊ नये म्हणून स्त्रियांनी घरातच बसावे असा सल्ला दिला जातो. एवढंच काय तर कोणताही गुन्हा घडला त्यात दलित, आदिवासी इत्यादी दुर्बल समुदायातील लोकांचा संबंध दिसला, तर सहजच या दुर्बल घटकातील लोकांकडे बोट दाखवले जाते. अगदी तशाच प्रकारे, म्हणजेच उपरोक्त भाजप नेत्यांचे मुस्लीम समाजातील लोकांनी घरात राहिले, तरच होळीच्या सनात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही असे म्हणणे आहे.
इथे हे भाजप नेते तसेच पोलीस अधिकारी चौधरी हे, खरच होळीचा सन शांततेत पार पडावा म्हणून मुस्लीम समुदायातील लोकांना घरात राहण्याचा सल्ला देत आहेत, का होळी सणाचा त्यांचे ५६ आणि आमचा १ असे बोलून दोन समाजात फुट पडण्याचा प्रयत्न करत आहेत?
खरतर पोलिसांची भूमिका कोणत्याही धर्माच्या आधारावर पक्षपात न करता कायद्याचे निष्पक्षपणे पालन करणारी हवी. एका विशिष्ठ समाजातील लोकांनी घराबाहेर न येण्याचा सल्ला देण्यापेक्षा, जो कोणी कायदा हातात घेईल त्यास कठोर शिक्षा होईल असे पोलीस अधिकारी यांनी सांगितले आणि त्याची काटेकोरपने पालन केले तर कोणीही गुन्हा करण्यास धजावणार नाही, कायद्याची भीती सगळ्यानाच असेल आणि निर्दोष लोकांचा बळी जाणार नाही.
बरं, असे बरेच सन साजरे होतात, राम नवमी आहे, गणेशोस्तव आहे, दुर्गा पूजा इत्यादी अशा कोणत्या सणाला शुक्रवार चा नमाज आला तर कोणकोणत्या सणाला बंद करायला लावणार? आणि हा दोन समाजात वाद न होण्यावर रामबाण उपाय असू शकतो का?
इतक्या वर्षानुवर्षे इथे सगळे सन मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. हिंदू मुस्लीम अशा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक एकत्र सन साजरे करत असल्याचा आपला इतिहास आहे. अगदी आनंदाने, एकोप्याने सन साजरे होत असताना आपण बघत आलो आहोत, मग आताच का बरे त्यांचे ५६ आणि आमचा १ असे बोलून मुस्लीम समुदायातील लोकांना होळीच्या दिवशी घरात बसण्याचा सल्ला दिला जात असेल?
या उलट हिंदू, मुस्लीम तसेच इतर समुदायातील लोकांनी मिळून आदराने एकमेकांचे सन साजरे केले तर!
तसे, हे काही नवीन नाही. आपला देश अशा गंगा-जमुनी संस्कृतीचा साक्षीदार आहे. यंदाचे होळीचेच उदाहरण घेता, होळीचा सण शुक्रवारच्या नमाजासोबत आला असल्याने, दिल्ली मधील सीलमपूर रहिवाशांनी जामा मशिदीजवळ नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम बांधवांवर फुलांची उधळण करून हा सण साजरा केला. रंगांच्या ऐवजी फुलांची निवड करून, स्थानिकांनी या प्रसंगाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला आणि सामुदायिक ऐक्याचा संदेश दिला. (Bharati, 2025) तसेच उत्तर प्रदेशातील संभळ येथे मुस्लिमांनी हिंदूंवर फुलांची उधळण करून होळी साजरी केली. (NDTV, 2024)
होळीला एकतेचा सण बनवणे
उपरोक्त भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून, होळीच्या सणाचा लोकांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी वापर केला जात असल्याचे दिसते. होळीच्या नावाखाली धार्मिक ध्रुवीकरण करणे आणि हिंदू राष्ट्रवाद बळकट करणे हि एक चिंतेची बाब आहे किंबहुना समाजात दोन समुदायांमध्ये यामुळे फुट पडण्याचा धोका आहे.
होळी हा सण प्रेमाचा, एकतेचा प्रतिक आहे. या सणाचा हा गाभा जिवंत ठेवण्यासाठी समाजाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन हा सण साजरा करावा, ज्यामुळे विविध समुदायांमध्ये सौहार्द निर्माण होईल. तसेच, सक्तीने खेळवली जाणारी होळी आणि महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर उपाय योजायला हवेत. कोणत्याही सणात सहभाग हा ऐच्छिक असावा आणि तो कोणावरही लादला जाऊ नये. याशिवाय, सांस्कृतिक एकात्मता टिकवण्यासाठी सामाजिक चळवळींनी पुढाकार घ्यावा आणि सहिष्णुतेचा संदेश पसरवावा.
होळी हा प्रेम, सौहार्द आणि रंगांचा सण राहावा, तो ध्रुवीकरण, जबरदस्ती आणि राजकीय वर्चस्वाचे साधन बनू नये. भारत या सणाला धार्मिक कट्टरतेच्या हातात जाऊ देणार की त्याचा खरा उत्सव म्हणून साजरा करणार, हा प्रश्न आता संपूर्ण समाजाने विचार करण्याची गरज आहे.
Hindustan Times. (2025, March 14). Rajasthan: 25-year-old stops 3 men from applying Holi colour. They choke him to death. https://www.hindustantimes.
India Today. (2025, March 7). Holi comes once a year, Friday namaz 52 times: UP cop’s remark triggers row. India Today: https://www.indiatoday.in/
India Today. (2025, March 11). Wear tarpaulin hijab or stay indoors: UP Minister’s bizarre Holi advice. https://www.indiatoday.in/
Livemint. (2025, March 15). Holi turns bloody in Uttar Pradesh: Man shoots friend in Moradabad for refusing to play colours with him. livemint: https://www.livemint.com/news/
Nagari, A. (2025, March 14). Stones thrown at cops during special Holi procession in UP’s Shahjahanpur. https://www.indiatoday.in/
Sheoran, A. (2025, March 13). UP Holi Celebration: Juma Namaz During Ramadan Coincides With Holi After 64 Years, Several Mosques Covered; Security Heightened. English Jagran: https://english.jagran.com/
Singh, S. (2025, March 11). Bihar BJP MLA is latest to ask Muslims to stay indoors during Holi; Tejashwi Yadav slams ‘divisive politics’. Indianexpress: https://indianexpress.com/
Singh, S. (2025, March 15). उन्नाव में होली के जश्न के बीच तणाव. आज तक: https://www.aajtak.in/uttar-
The Hindu. (2025, March 15). After Ratnagiri mosque gates rammed during religious procession, police say there was no forcible entry. The Hindu: https://www.thehindu.com/news/
The Indian express. (2025, March 15). Clashes erupt during Holi celebrations in Jharkhand’s Giridih, vehicles set ablaze. The Indian Express: https://indianexpress.com/