मिथिला राऊत

शिवाजी महाराज्यांच्या काळात उर्दू भाषा बोलली जात होती, परंतु  ती हिंदुस्थानी” म्हणून ओळखली जात होती.  तसेच  महाराजांनी एक समिती नेमुन त्या वेळच्या उर्दू भाषेचा “राज्यव्यवहार नावाचा” एक शब्दकोश तयार केला होता.” असे प्रतिपादन प्रा. अब्दुस सत्तर दळवी यांनी डॉ.असगर अली इंजिनीअर स्मृती जीवनगौरव पुरस्कार २०२१ या पुरस्कार समारंभामध्ये बोलत असताना केले. हा समारंभ 18 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 4 ते 5.30 या वेळेत ICSSR कॉन्फरन्स हॉल, जे. पी. नाईक भवन, मुंबई विद्यापीठ, कालिना कॅम्पस, विद्यानगरी, मुंबई 400098 येथे सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम ने आयोजित केला होता.

2021चा डॉ. असगर अली इंजिनीअर स्मृती जीवनगौरव पुरस्कार हा प्रा. अब्दुस सत्तर दळवी प्रसिद्ध विद्वान, भाषा शास्त्रज्ञ आणि अनुवादक, मुंबई विद्यापीठातील उर्दू विभागाचे संस्थापक यांना, ॲड. इरफान इंजिनीअर, सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे संचालक आणि लेखक यांच्या हस्ते रुपये पंचवीस हजार चा चेक आणि सायटेशन सह प्रदान करण्यात आला.

सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम (CSSS), सेंट्रल बोर्ड ऑफ दाऊदी बोहरा कम्युनिटी, इन्स्टिटय़ूट ऑफ इस्लामिक स्टडीज आणि बोहरा युथ संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. असगर अली इंजिनिअर जीवनगौरव पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

पारितोषिक देऊन झाल्यावर ॲड. इरफान इंजीनिअर यांनी सायटेशन वाचून दाखवले ते असे “प्रा. अब्दुस सत्तार दळवी हे मुंबई विद्यापीठातील उर्दू विभागाचे संस्थापक आहेत. 1982-1997 या कालावधीत ते विभाग प्रमुख आणि कृष्ण चंदर प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. प्रा. दळवी यांनी मराठी, हिंदी आणि इंग्लिश साहित्याचे उर्दू भाषेत अनुवाद केलेले आहेत. या अनुवादांमुळे भारतातील विविध भाषिक समूहांना एकमेकांचे साहित्य जाणून घेण्याची संधी त्यांनी उपलबध करून दिली आहे. ते उर्दू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांच्यातील भाषिक आणि साहित्यिक अनुवादासाठी काम करणारे विख्यात अभ्यासक आहेत. संत रामदासांच्या ‘मनाचे श्लोक’ आणि  संत ज्ञानेश्वर यांनी रचलेले ‘पसायदान’ या उत्कृष्ट मराठी कवितांचा त्यांनी उर्दूमध्ये अनुवाद केलेला आहे. पी. एस. रेगे यांच्या ‘सावित्री’ आणि ‘अवलोकिता’ आणि विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या तीन मराठी कादंबऱ्यांचा त्यांनी उर्दूमध्ये अनुवाद केला आहे. रणांगणसाठी 1990 मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित अनुवाद पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी प्रख्यात भारतीय इंग्रजी कवी निस्सीम एझकील यांच्या एडिनबर्ग – इंटरल्यूडचे झिकर-ए-एडिनबर्ग म्हणून उर्दूमध्ये भाषांतर केले आहे ज्याची सर्वत्र प्रशंसा झाली आहे. त्यांनी तुलसीदासाची ब्रजभाषा (हिंदी) कविता उर्दू जगाला दिली. त्यांनी अमृत बानी हा उर्दू आणि हिंदी काव्यसंग्रह संपादित केला आहे.

राज्य उर्दू साहित्य अकादमी आणि महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर यासह अनेक प्रतिष्ठित संस्थांचा ते भाग आहेत. गालिब अकादमीचा प्रतिष्ठित गालिब पुरस्कार, महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचा संत ज्ञानेश्वर पुरस्कार आणि 1990 मध्ये साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित अनुवाद पुरस्कार यासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.”

हा पुरस्कार स्वीकारताना प्रा. दळवी म्हणाले, “मी हा सत्कार नम्रपणे स्वीकारतो. भारतात निर्माण झालेल्या समृद्ध साहित्यात आणि संमिश्र संस्कृतीच्या संवर्धनासाठी उर्दूचे योगदान ओळखण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.”

प्रा. दळवींबद्दल बोलताना श्री. मुझम्मिल सरखोत, सहाय्यक प्राध्यापक, उर्दू विभाग, मुंबई विद्यापीठ, म्हणाले कि समाजात जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारे डॉ. असघर अली इंजीनिअर यांनी आपले आयुष्य समर्पित केले तसेच प्रा. दळवी यांनी देखील वेगवेगळ्या भाषिक लोकांना एकत्र आणून जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले. त्यांनी फक्त मराठी आणि उर्दू मध्येच लिखाण मर्यादित न ठेवता इंग्रजी संस्कृत, कन्नड, आणि गुजराती इत्यादी भाषांमधील साहित्यांचा देखील अनुवाद केला आहे. तसेच ते महात्मा गांधींच्या विचारांशी खूप जवळ होते, त्यांच्या पावलावालावर पाऊल ठेऊन आपल्या लिखाणातून समाजात शांती आणि सलोखा निर्माण करण्यासाठी त्यांनी पुरेपूर कार्य केले.

“प्रा.अब्दुस सत्तार दळवी यांनी मराठी साहित्य उर्दू मध्ये भाषांतरित करून मराठी भाषिक आणि उर्दू भाषिक समुदायांना जवळ आणण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. विशेषतः मराठी संत साहित्याचे उर्दू मध्ये केलेल्या अनुवादामुळे या समुदायांमध्ये अधिक चांगली समज आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाला चालना मिळाली.” असे प्रा. इंद्रा मुन्शी, मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख म्हणाल्या.

प्रा. दळवी यांनी उर्दू मध्ये अनुवाद केलेले मराठी भाषेतील संत ज्ञानेश्वर लिखित “पसायदान” प्रा. दळवी यांनीच वाचून दाखवले. उर्दू भाषेतील पसायदान ऐकताच ॲड. इरफान इंजीनिअर म्हणले कि, “उर्दू भाषेतील पसायदान आणि कुराणातील काही आयात अगदी सारख्याच वाटत आहेत. पसायदान आणि कुराण ची भाषा वेगळी आहे. पण त्यातील विचार आणि मूल्ये सारखीच आहेत.”

जवळ जवळ 70 लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. महिलांसाठी काम करणाऱ्या सुप्रसिद्ध भारतीय वकील, कायद्यातील तज्ञ फ्लेविया अग्नेस आणि माजी खासदार हुसेन दलवाई हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. उपस्थितांपैकी एकाने “छतंत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्य उभारण्यामध्ये  त्यावेळेच्या मुस्लिम लोकांनी केलेल्या योगदानाबद्दल तुम्ही लिहिले आहे का किंवा तुमचा यावर काही लिहायचा विचार आहे का?” असा प्रश्न प्रा. अब्दुस सतरा दळवी यांना केला असता प्रा. दळवी म्हणाले, ” मी या विषयावर फारसं लिखाण केलेले नाही पण हे सांगण्यासारखे आहे कि, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळातील शेख मोहम्मद आणि इतर चार – पाच शायर होते त्यांनी उर्दू आणि मराठी दोन्ही भाषांचा वापर करून शायरी तयार केल्या आहेत. त्या व्यतिरिक्त शिवाजी महाराज्यांच्या काळात उर्दू भाषा बोलली जात होती पण ती भाषा  “हिंदुस्थानी म्हणून ओळखली जात होती.

शिवाय निकोलाओ मानुची एक इटालियन प्रवासी प्रवास करत भारतात आला आणि तो जेंव्हा महाराष्ट्रात फिरत होता तेंव्हा त्याची भेट छात्रपती शिवाजी महाराजांसोबत झाली. तो जेंव्हा दरबारात गेला तेंव्हा तो प्रवासी आणि शिवाजी महाराज यांच्या मध्ये जी  “गुफ्तगु ” झाली ती फारसी किंवा हिंदुस्थानी मध्ये म्हणजेच उर्दू मध्ये झाली.”

या वरून आपल्याला हे कळते कि उर्दू भाषा फक्त मुस्लिम समाजातील लोकांचीच आहे असा जो सध्या समज पसरवला जात आहे तो पूर्णपणे खोटा आहे.

डॉ.असगर अली इंजिनीअर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इस्मालिक विचारवंत होते. ते सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम (CSSS), चे संस्थापक आहेत. ते राईट लाईव्हलिहूडचे ते मानकरी आहेत. धार्मिक सलोख्याच्या क्षेत्रात त्यांनी प्रदीर्घ कार्य केले आहे. तसेच दाऊदी बोहरा समाजातील पुरोगामी सुधारणा, तसेच स्त्री-पुरुष लैंगिक समानतेच्या मुद्द्यांवर डॉ.असगर अली इंजिनीअर यांचे मोलाचे कार्य आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणार्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो.

2019 चा डॉ. असगर अली इंजिनीअर जीवनगौरव पुरस्कार केरळमधील प्रख्यात कादंबरीकार के.पी. रामानुन्नी यांना प्रदान करण्यात आला होता तर 2020 चा पुरस्कार न्यायमूर्ती होसबेट सुरेश यांना त्यांच्या जातीय सलोख्यातील असणाऱ्या योगदानासाठी त्यांच्या मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता.

 

Report in English version click here>>>

Make a donation to support us

Donate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*