मिथिला राऊत
14/05/2025
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. वर्तमान पत्रात नमूद केल्याप्रमाणे, सुमारे वीस मिनिटे चाललेल्या या भीषण हल्ल्यात दहशतवाद्यांनी पुन्हा पुन्हा धर्म विचारून २६ पुरुषांची निर्दयपणे हत्या केली, त्यापैकी एक स्थानिक काश्मिरी मुसलमानही होता. (Mollan, 2025) या क्रूर घटनेने भारतभर संतापाची लाट उसळली. भारताच्या कानाकोपऱ्यातुन या अमानवीय आणि निर्घुण घटनेचा निषेध करण्यात आला. सर्व धर्मांतील लोक तसेच धर्मगुरू, सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांनी या दहशतवादी हल्याचा तीव्र निषेध केला. परंतु हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी देशातील विविध भागांत पहलगाम मधील आतंकवादी हल्ल्याचा बदला म्हणून, ज्यांचा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याशी काहीही संबंध नाही तसेच हा दहशतवादी हल्ला ज्यांच्या नियंत्रणाखाली देखील नाही, त्या कृत्यावर ज्यांचा आजीबात प्रभाव देखील नाही अशा निरपराध मुस्लीम समुदायातील लोकांवर हल्ला केल्याच्या, त्यांना धमक्या दिल्याच्या घटना घडल्या. अशा काही घटनांचा आढावा खालील प्रमाणे:
अलीगडमध्ये, २८ एप्रिल २०२५ रोजी एका मुस्लिम विद्यार्थ्याकडून जबरदस्तीने पाकिस्तानी झेंड्यावर लघुशंका करविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यात काही तरुणांनी त्या विद्यार्थ्याला घेरले असून, शिवीगाळ करत जबरदस्तीने हे कृत्य करवताना दिसत आहे. (Kumar, 2025)
उत्तर प्रदेश मधील शामली जिल्ह्यातील तोडा गावात घडलेल्या एका घटनेत, सरफराज नावाच्या २५ वर्षीय युवकाने आरोप केला की, २६ एप्रिल रोजी त्याच्या गोविंद नावाच्या शेजाऱ्याने त्याच्यावर हल्ला केला. सरफराजच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने मारहाण करताना “२६ मारले, तुमचेही २६ मारू” अशी धमकी दिली. (Kumar, 2025)
शबीर अहमद डर, काश्मीरमधील रहिवासी, गेली २० वर्षे उत्तराखंड मधील मसुरी येथे पश्मीना शाली विकत आहे. काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, एका उजव्या विचारसरणीच्या गटाने त्याच्यावर आणि त्याच्या सहकाऱ्याला मारहाण केली व दुकाने उद्ध्वस्त केली. शबीर म्हणाला, “आम्हाला पहलगाम मधील हल्ल्याचा दोष देण्यात आला आणि शहर सोडून पुन्हा कधीही न येण्याची धमकी देण्यात आली.” (Mateen & Javeed, 2025)
पहलगाम मधील हत्याकांडानंतर भारतभर काश्मिरी मुस्लीम समुदायातील लोकांवरील हल्ले आणि छळाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामधून एक अत्यंत गंभीर घटना २३ एप्रिल २०२५ रोजी पंजाबमधील डेहरा बस्सी येथील युनिव्हर्सल ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्समध्ये घडली, जिथे काश्मिरी विद्यार्थ्यांना त्यांच्या होस्टेलमध्ये हल्ला करण्यात आला. (Independent, 2025)
हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील खरावर गावात मुस्लिम कुटुंबांना २ मेपर्यंत गाव सोडण्याचा आदेश देण्यात आला. दीपक मलिक आणि इतर काही गावकऱ्यांनी व्हॉट्सअॅप गटावर “पहलगाममधील घटनेवर” आधारित संदेश पाठवून मुस्लिम कुटुंबांना गावातून हटवण्याची मागणी केली. १५ मुस्लिम कुटुंबांना गाव सोडण्याचा ठराव देण्यात आला असून, त्यातील बहुतेक लोक नजीकच्या कारखान्यांमध्ये मेकॅनिक, कामगार किंवा लहान-मोठे कचरा विक्रेते म्हणून काम करतात. (Sura, 2025)
भाजपच्या कार्यकर्त्या अक्षता तेंडूलकर व इतर नऊ जनांवर, मुंबईच्या दादरमध्ये २४ एप्रिल रोजी सोफियान शाहीद अली नावाच्या २१ वर्षीय युवकाला रोहिंग्या मुस्लिम समजून धमकावून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात आरोपींवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार सौरभ मिश्रा मुंबईच्या दादर मार्केटमध्ये टॉवेल विक्रीचा गाडा चालवतात आणि त्यांच्या सोबत एकूण सहा कामगार काम करतात, त्यापैकी अधिकतर मुस्लिम आहेत. त्यातला एक कामगार, सोफियान, उत्तर प्रदेशचा असून गेल्या सहा महिन्यांपासून मिश्रांसोबत काम करत आहे. (Chitnis, 2025)
मुंबईतील सांताक्रूझ मधील वाकोला येथे २६ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान, बांगलादेश आणि फिलस्तीन चे झेंडे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लावले होते. फलीस्तीनच्या झेंड्याचा अपमान करू नये अशी मुस्लीम समुदायातील तरुणांनी मागणी केली. त्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला ज्यात काही जण जखमी झाले. या घटनेची सत्यता तपासण्यासाठी सी.एस.एस. ची टीम गेली असता समजले कि, वाकोला मधील गोळीबार या भागात हिंदू-मुस्लीम लोक बर्याच वर्षांपासून एकोप्याने राहत आहेत. ते एकमेकांच्या सन-समारंभात देखील सामील होतात. पण गेल्या दोन – अडीज वर्षांपासून हिंदू – मुस्लीम समुदायांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी लोक करत आहेत. परंतु त्यांना यश आले नाही. परंतु या वादामध्ये काहीही संबंध नसलेल्या अबरार शेख ला त्याने घातलेल्या टी शर्ट वर “असीम” हे नाव लिहिले होते म्हणून बजरंग दलाच्या कार्यकार्त्यांनी मारले असल्याचे त्याचा भाऊ असीम याने सांगितले.
वरील घटनांवरून हे स्पष्ट होते की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांना न्याय मिळावा, हा उद्देश या हिंदुत्ववादी लोकांच्या वर्तनात दिसून येत नाही. उलट, या भयंकर हल्ल्याचा वापर समाजात मुस्लिमांविषयी द्वेष पसरवण्यासाठी केला जात असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होते. पाकिस्तानातील काही दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष कृत्याचा सूड भारतातील सामान्य मुस्लिम नागरिकांकडून घेणे हे ना नैतिकदृष्ट्या योग्य आहे, ना कायदेशीरदृष्ट्या.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यामागे आतंकवाद्यांचा, सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे भारत सरकारचे म्हणणे आहे. ७ मे २०२५ रोजी पहाटे १:४४ वाजता भारताने सुरु केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर ८ मे २०२५ रोजी प्रेस स्टेटमेंट मध्ये श्री. विक्रम मिस्री, परराष्ट्र सचिव, यांनी सांगितले की, “जम्मू आणि काश्मीर तसेच इतर ठिकाणी सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. हे कट उधळून लावण्यात आले हे सरकार आणि भारतीय जनतेचे श्रेय आहे.” (High Commission of India, 2025) . आतंकवाद्यांचा सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा कट अयशस्वी करण्यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचे श्रेय आहे त्यात भारतीय मुस्लीम देखील सहभागी आहेत.
यावरून हे स्पष्ट होते की, या आतंकवादी हल्ल्याचा मुख्य उद्देश भारतात हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करणे होता. म्हणजेच जर भारतात मुस्लीम समुदयावर कोणत्याही घटनेच्या निमित्ताने हल्ले होत राहिले, त्यांना धमकावले जात असेल, तर पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राचा भारतात सामाजिक द्वेष निर्माण करण्याच्या हेतूला प्रोत्साहन मिळेल. इतिहास दर्शवतो की जिथे सामाजिक स्थिरता बिघडते, तिथे आर्थिक स्थिरता देखील ढासळते. आणि अशा परिस्थितीत, त्या समाजातील दुबळ्या व्यक्तींना सर्वाधिक फटका बसतो, मग ती व्यक्ती कोणत्याही धार्मिक समुदायाची असो. म्हणजेच, भारतातील मुस्लीम समुदायातील निरपराध नागरिकांवर हल्ला करणे हे राष्ट्रवादाचे लक्षण नाही, उलट अशा कृती देशाच्या एकात्मतेला आणि सामाजिक सलोख्याला बाधा पोचवतात.
अनेक इस्लामी विद्वानांनी इस्लामच्या नावावर केले जाणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. काहींनी कुरआनमधील अध्याय ५, आयत ३२ चा संदर्भ दिला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे:
“जो कोणी एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव घेतो, त्याने जणू संपूर्ण मानवजातीचा जीव घेतला; आणि जो कोणी एखाद्याचे प्राण वाचवतो, त्याने जणू संपूर्ण मानवजातीचे प्राण वाचवले.”
इस्लामसह इतर धर्मही हिंसेचा विरोध करतात आणि शांततेचा, प्रेमाचा संदेश देतात, मात्र दुर्दैवाने, काही वेळा धर्म लोकांना हिंसेसाठी प्रेरित होण्याचे कारण ठरतो.
भारताची खरी ओळख ही भारताच्या विविधतेतील एकतेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ३० मार्च २०२५ रोजी सांगितले की, विविध सण आणि नववर्ष साजरे होणे ही भारताच्या विविधतेतील एकतेची भावना दर्शवते. ‘मन की बात’मध्ये बोलताना त्यांनी सर्वांना ईदसह सणांच्या शुभेच्छा दिल्या आणि एकतेची भावना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. (The Hindu, 2025) वेगवेगळे सन साजरे करून विविधतेतील एकतेचा वारसा जपणाऱ्या भारतीयांनी, दहशतवादाचा ठाम निषेध करत आपली एकता दाखवली आहे.
मुस्लिम समाजानेही या दहशतवादी हल्ल्याचा ठामपणे निषेध केला आहे. जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, पंजाब, आसाम, कर्नाटक अशा देशाच्या विविध राज्यांमध्ये मुस्लिम नागरिक रस्त्यावर उतरून दहशतवादाविरोधात शांततेत निषेध नोंदवला. जमीयत उलेमा-ए-हिंद, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमात-ए-इस्लामी हिंद यांसारख्या प्रमुख मुस्लिम संघटनांनी देखील या हिंसाचाराचा तीव्र निषेध करत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली.
२७ एप्रिल २०२५ रोजी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी परभणी (महाराष्ट्र) येथील एका जाहीर सभेत बोलताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर तीव्र शब्दांत टीका केली.त्यांनी म्हटले, “पाकिस्तान नेहमी स्वतःला अण्वस्त्र शक्ती म्हणवतो, पण जर तुम्ही दुसऱ्या देशात घुसून निरपराध लोकांची हत्या करणार असाल, तर त्या देशाकडून प्रतिक्रिया येणारच. कोणतीही सरकार असो, आपल्या भूमीवर आपल्या लोकांना धर्माच्या आधारावर लक्ष्य केल्यास त्याला शांततेने उत्तर दिलं जाणार नाही. ‘दीन’च्या नावावर अशा अमानवी कृत्यांना कोणताही धर्म मान्यता देत नाही. तुमचं वर्तन हे आय.एस.आय.एस सारखंच क्रूर आणि निर्दयी आहे.” (The Hindu, 2025)
ए. आय. यु. डी. एफ. चे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी या हल्ल्यास जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या पाठराखण करणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हा हल्ला मानवी मूल्यांवर आणि देशातील शांतता-सौहार्दावर केलेला घात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी केंद्र सरकारला पीडितांना न्याय देण्यासाठी तात्काळ आणि कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले. (Kalita, 2025)
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत, प्रमुख मुस्लिम संघटनांनी हा इस्लामच्या शांततेच्या संदेशाच्या विरोधात असल्याचे सांगितले. जमीयत उलेमा-ए-हिंद, भारतातील प्रमुख मुस्लीम धार्मिक संगठन ने देखील दहशतवादाला “कॅन्सर” म्हटले असून शांततेच्या संदेश देणाऱ्या इस्लामिक तत्वाच्या विरोधात जात असल्याचे म्हटले. ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इल्यासी यांनी सांगितले की, देशभरातील ५.५ लाखांहून अधिक मशिदींमध्ये इमाम २५ एप्रिल २०२५ शुक्रवारच्या नमाजदरम्यान दहशतवादाविरोधी कडक संदेश देतील आणि पहलगाम हल्ल्यातील बळींसाठी प्रार्थना करणार आहेत. (Hindustan Times, 2025) जमीयत उलेमा-ए-हिंद ने भारतात जेंव्हा जेंव्हा दहशत वादी हल्ला झाला तेंव्हा तेंव्हा, त्या हल्ल्या विरोधात भूमिका घेतली आहे.
या व्यतिरिक्त शुक्रवारी, २५ एप्रिल २०२५ रोजी, कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यात जम्मू आणि काश्मीरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिमांनी आंदोलन केले. (NDTV, 2025). २५ एप्रिल २०२५ रोजी, देशभरातील मुस्लिम समुदायातील लोकांनी विविध भागात शुक्रवारच्या नमाजनंतर पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. (Nayak , 2025). तसेच २५ एप्रिल २०२५ रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ, खरगोन आणि हरदा जिल्ह्यांमध्ये मुस्लिम समुदायाने पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध नोंदवत पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. (The Economic Times, 2025). त्याच प्रमाणे २५ एप्रिल २०२५ रोजी, विविध राज्यांमधील मुस्लिम समुदायाने पहलगाम हल्ल्याचा निषेध करत शुक्रवारच्या नमाजेनंतर आंदोलन केले. दिल्लीतील सरदार बाजार, भागीरथ प्लेस, गांधी नगर, नया बाजार, खरी बावली, चावडी बाजार, चांदणी चौक, जामा मशीद आणि हौज खास या ठिकाणी निषेध आंदोलन झाले.
या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी मुस्लीम समुदायातील लोकांकडून या आतंकवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला गेला. खरंतर, पहलगाममधील हिंसक अतिरेकी हल्ल्याचा संपूर्ण भारतातील नागरिकांनी निषेध केला. परंतु मुस्लीम समुदायाने केलेल्या निषेधावर विशेषतः लक्ष देण्याचे कारण म्हणजे, पहलगाममधील हल्ल्याला भारतातील सर्वसामान्य मुस्लीम समुदायाला जबाबदार ठरवून त्यांच्यावर हल्ले करण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. सोशल मीडियावर मुस्लीम समुदायाविषयी द्वेष निर्माण करणारे स्टेटस आणि स्टोरीज दिसू लागले, या संदेशांमधून संपूर्ण मुस्लीम समाजाला आतंकवादी म्हणून दर्शवले जात असल्याचा भास होत होता.
मुस्लीम समुदायाने आपल्या धर्माच्या नावावर आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून, या दहशतवादी क्रूर हिंसाचाराचा निषेध केला, जो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला जाणे आवश्यक आहे. जेणेकरून, मुस्लीम समुदायाविषयी जाणूनबुजून समाजात द्वेष पसरवण्याच्या प्रयत्नांना आळा बसेल.
इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासाखी आहे ती म्हणजे, पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी गुरुवारी २४ एप्रिल २०२५ रोजी सांगितल्या प्रमाणे, पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस अगोदर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी काश्मीर हा पाकिस्तानचा महत्वाचा भाग आहे असे म्हटले होते, काश्मीर चा “jugular vein”, असा उल्लेख केला होता. हे भाष्य भारताला चिथावणी दिल्यासारखे आहे. (Ganguly, 2025) तसेच २६ एप्रिल रोजी, असीम मुनीर यांनी देशातील प्रमुख लष्करी अकादमीच्या पदवीदान समारंभात कॅडेट्सना संबोधित करताना “द्वि-राष्ट्र सिद्धांत” ची आठवण करून दिली. मुनीर म्हणाले कि, “द्वि-राष्ट्र सिद्धांत” – १९४७ मध्ये पाकिस्तानच्या स्थापनेमागील चौकट आहे, ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे वेगळे राष्ट्र आहेत आणि हिंदू आणि मुस्लिम समुदायातील लोकांना वेगळ्या मातृभूमीची आवश्यकता आहे असे देखील प्रतिपादन केले होते. (Times of India, 2025)
तथापि पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारत सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या संबंधित, प्रेस कॉन्फरन्स परराष्ट्र सचिव श्री. विक्रम मिस्री, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि सेना अधिकारी सोफिया कुरेशी यांनी संबोधित केले. यावरून भारतात सर्व धर्मीय लोक एकोप्याने राहतात हेच मुनीर यांना दाखवून देत त्यांचा “ द्वी राष्ट्र सिद्धांत” भारताने फोल ठरत असल्याचे सांगते.
इथे आपल्याला दोन बाजूंनी द्वि-राष्ट्र सिद्धांताला पाठिंबा दिला जाताना दिसतो — एक बाजू आहे पाकिस्तानकडून, जिथे असीम मुनीरसारखे अधिकारी आणि पाकिस्तान मधील अतिरेकी या विभाजनकारी विचारसरणीचा पुरस्कार करतात; आणि दुसर्या बाजूला आपल्या देशातील काही हिंदूत्ववादी विचारसरणीच्या लोकांची आहे, जे या सिद्धांतास पाठींबा देतात. पण भारत सरकार आणि भारतातील जनतेनेही यावर ठामपणे मत व्यक्त केले आहे की धर्माच्या आधारावर विभाजन स्वीकारले जाऊ शकत नाही.
दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीस न्याय मिळाला पाहिजे, मग ती व्यक्ती कोणत्याही धार्मिक समुदायातील असेल. आपण सर्वांनी मिळून शांतता, एकात्मता आणि ऐक्य यासाठी उभं राहिलं पाहिजे.
“अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीच्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे (BBC News, 2025), याचे मनःपूर्वक स्वागत आहे.
युद्ध हा दहशतवादाचा शाश्वत उपाय ठरू शकत नाही. शांतता आणि न्यायाधिष्ठित धोरणेच दीर्घकालीन सुरक्षिततेचा मार्ग दाखवू शकतात. शस्त्रसंधी हे केवळ संघर्षाचा शेवट नाही, तर नव्या आशेची सुरूवात आहे. युद्ध, द्वेष आणि हिंसा या नकारात्मक चक्रातून बाहेर पडण्यासाठी प्रेम, शांतता आणि एकोप्यावर आधारित भविष्य घडवण्याची गरज आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीला पाठींबा देत, आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन शांती, सौहार्द आणि सलोखा टिकवण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.