Photo Credit Loksatta

मिथिला राऊत.

 

01/05/2024

 मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना त्यांच्या मुलाच्या “जहांगीर” या नावावरून ट्रोल होत असल्याच्या बातम्या गेल्या तीन-चार दिवसांपासून दिसत आहेत. हा ट्रोल इतका टोकास गेला कि, चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पुढे न साकारण्याचा निर्णय घेतला आहे. खरतर मांडलेकर यांचा मुलगा जहांगीर हा आता अकरा वर्षांचा आहे. आतापर्यंत मांडलेकर यांनी फर्जंद (२०१८), ‘फत्तेशिकस्त’ (२०१९), ‘पावनखिंड’ (२०२२), ‘शेर शिवराज, ’(२०२२), ‘सुभेदार’ (२०२३) आणि ‘शिवरायांचा छावा ‘(२०२४) या सहा चित्रपटांमध्ये राजे छत्रपती शिवाजी महराज यांची भूमिका साकारलेली आहे.

मांडलेकर हे २०१८ पासून म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. आश्चर्य म्हणजे २२ एप्रिल २०२२ ला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी ‘हिंदुस्थान पोस्ट ‘ या यु ट्यूब चानेल वर चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या मुलाचे नाव “जहांगीर” हे जे. आर. डी. टाटा यांच्या नवा वरून ठेवण्यात आल्याचे स्पष्ठीकरणही दिले होते (Mandlekar, 2022). त्यावेळी मात्र मांडलेकर, शिवरायांची भूमिका साकारताना सर्वांना पटले, त्यांना काहीच प्रश्न नव्हता आणि आता “जहांगीर” या नावावरून का बरे ट्रोल करावेसे वाटले असावे?

तर नेहा मांडलेकर, अभिनेता मांडलेकर यांची पत्नी, त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या विडीव्हो मध्ये सांगताना दिसतात कि, “काही दिवसांपूर्वी चिन्मय यांनी एक मुलाखत दिली होती आणि त्यानंतर त्यांना ट्रोल व्हायला सुरुवात झाली. “ तर मांडलेकर यांनी ‘अजब गजब’ या यु ट्यूब चानेल वर आज २३ एप्रिल पासून दहा दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये शिवाजी महाराज, काश्मीर फायील्स मध्ये फारुख मलिक बिट्टा ची भूमिका, इत्यादी अशा वेगवेगळ्या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर “धर्म निरपेक्षता म्हणजे तुमच्या मते काय?” असा प्रश्न मांडलेकर यांना मुलाखत घेणाऱ्याने केला असता ते म्हणाले “ राजकीय यंत्रणा आणि धार्मिक विश्वास हे वेगवेगळे असावे.” ते पुढे म्हणाले घराच्या चार भिंतींच्या आत आपला धर्म पाळला पाहिजे. घराच्या बाहेर समाजात वावरताना आपण सगळे भारतीय नागरिक आहोत. त्याच प्रमाणे मतदानाविषयी म्हणाले कि,“ मी नेहमी न चुकता मतदान करतो. नेहमी वेगवेगळ्या पार्टीला मतदान केले आहे. जो काम करतो त्यालाच मतदान करतो. खूप विचार पूर्वक मतदान करतो आणि नोटा कधी दाबत नाही.” त्याच प्रमाणे समाजातील प्रश्नांबाबत मुलांसोबत चर्चा कशा प्रकारे करता, या प्रश्नावर मांडलेकर म्हणाले “मुलांना रोज वर्तमानपत्र वाचायला सांगतो, त्यांना नेहमी सांगतो प्रत्येक गोष्ठीचे विश्लेषण करून निष्कर्षाप्रत या, फक्त अंधभक्त बनू नका”. (Mandlekar, 2024)

यावरून लक्षात येते कि, मांडलेकर यांनी मांडलेले धर्म पालानाविषयीचे मत बहुधा ट्रोल कर्त्यांना खटकले असावे. मांडलेकर यांनी सांगितलेले चार भिंतींच्या आत धर्म पाळला पाहिजे, बाहेर आपण सर्व भारतीय नागरिक आहोत तसेच राजकीय यंत्रणा आणि धार्मिक विश्वास वेगवेगळा असला पाहिजे, हे वाक्य कदाचित इतकी मेहनत घेऊन धर्माच्या नावावर राजनितीकरण करणाऱ्यांना पटले नसावे. त्यातही लोकसभा मतदान तोंडावर असताना तर मुळीच पचले नसावे.

ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट्स वरून हिंदुत्व वादी विचारांचा पगडा असलेले दिसतात. कारण कमेंट्स मध्ये, “शिवरायांची भूमिका करतोस आणि मुलाचे नाव जहांगीर कसे ठेवतोस?” “पाकिस्तान मध्ये जावा’ ‘जहांगीर ठेवलं आता खान पण लाव’, ‘सुंता नाही केली का?” इत्यादी. लिहिलेले दिसतात.

हिंदुत्ववादी विचारसारणीचे लोक, हे इतरांवर हिंदू धर्म थोपवण्याचा प्रयत्न करतात आणि इतर धर्मांचा द्वेष करतात विशेषतः मुस्लीम धर्माचा. सर्वांनी हिंदूच धर्माचे पालन केले पाहिजे असा त्यांचा हट्टाहास असतो. हे लोक उदारमतवादाच्या विरोधात असतात. इतरांना आपल्या बंधनात ठेवतात. कुणी काय घालायचे, काय खायचे, कुणाशी लग्न करायचे, पाल्यांची नावे काय ठेवायची हे व्यक्तीचे वयक्तिक निर्णय देखील त्यांना घ्यायचे असतात. एखादा राजकीय नेता काय बोलतो, का बोलतो, तो खरच काम करतोय का, हे प्रश्न न विचारता हिंदूत्ववादी नेत्याचे अनुयायी बनावयास प्रोत्साहन देतात आणि स्वत:ही होतात. त्याच प्रमाणे कट्टर मुस्लीम/ मुस्लीम साम्प्रदायीकवादी देखील अशाच प्रकारे धर्माच्या नावावर मुस्लीम समुदायातील लोकांवर निर्बंध लादत असतात. इतर धर्मांचा द्वेष करतात. त्यांनाही स्वत:चाच धर्म श्रेष्ठ वाटतो. किंबहुना कोणतीही धर्मातल्या कट्टर/सांप्रदायिक व्यक्तीला असेच वाटते.

हे धर्मांद लोक मग, जर कोणी आपल्या हक्कांविषयी, स्वातंत्र्याविषयी, विचार मांडले कि, काही तरी निमित्त काढून त्या व्यक्तीला जमेल त्या मार्गाने त्रास देतात. आणि याचाच परिणाम म्हणून आज अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना लक्ष केलेलं दिसतंय. चिन्मय मांडलेकर हि पहिलच व्यक्ती नाही आणि कदाचित दुर्दैवाने शेवटचीही नसावी. चिन्मय यांना फक्त ट्रोल करीत आहेत काही लोकांवर जीव घेणे हल्ले झालेले आहेत. काहींना तर जीव गमवावा लागला आहे, त्यांचे विचार व्यक्त केल्या मुळे. त्यामुळेच चिन्मय व त्यांच्यासारख्या इतरांसोबत एक सुजाण नागरिक म्हणून आपण उभे राहिले पाहिजे.

ट्रोल करणाऱ्यांचे म्हणणे शिवरायांची भुमिका करणाऱ्याने आपल्या मुलाचे नाव “जहांगीर” नाव ठेऊ नये, का तर ते मुस्लीम नाव आहे. खरतर जहांगीर हे नाव मुस्लीम नाही ते पर्सिअन आहे. तसेच मांडलेकर यांनी सांगितल्या प्रमाणे जे. आर. डी. टाटा यांचे नाव देखील जहांगीर होते. आता टाटाची उत्पादने घेणे हे ट्रोलर्स बंद करणार आहोत का?

खरतर हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक “शिवाजीमहाराज विरुद्ध मुसलमान आणि खास करून हिंदू विरुद्ध मुस्लीम” हे चित्र सर्वसामान्यांच्या मनात बिंबवण्याचे काम करताना दिसतात, हाच इतिहास आहे हेच जणू सत्य आहे हे लोकांच्या मनात ठासून भरवण्याचे काम करतात. किंबहुना काही अंशी ते यशस्वी झाल्याचेही दिसते. त्यामुळेच सातारा मधील पुसेसावळी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात सोशल मिडिया वर शेअर केलेल्या पोस्ट मुळे धार्मिक दंगल झाली होती, ज्यात एकाला जीव गमवावा लागला. शिवाजी महाराज महाराष्ट्रातील लोकांसाठी खूप संवेदनशील विषय आहे. या संवेदनेचा वापर हिंदुत्ववादी लोक राजकीय हेतू सध्या करण्यासाठी करताना दिसतात. रंग से पेहेचान लेंगे म्हणणरे आता चक्क शिवरायांच्या नावे जणू “नाम से पेहेचान लेंगे” म्हणत धार्मिक ओळख हि खूपच महत्वाची ओळख आहे हे लोकांच्या मनात खोलवर बिंबवत असल्याचे दिसते.

हे चित्र पाहिल्यावर मनात प्रश्न येतो कि, या ट्रोलर्सनी , हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक जे स्वत:ला शिवराय भक्त समजतात त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दलचे एक पुस्तक तरी वाचले असेल का? जर वाचले असेल तर शिवरायांच्या नावाने दोन धर्मांमध्ये द्वेष कसा काय पसरवतात? त्यांना खरच शिवराय समजले आहेत का?

शिवरायांनी धर्म, जात, भाषा किंवा पंत, लिंग यावरून कुणाही सोबत भेदभाव न केल्याचा घटना इतिहासात नमूद आहेत. राजे शिवाजी यांचा लढा हा औरंजेब, मुघल हे मुसलमान होते म्हणून नव्हता तर ते जुलमी होते, आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय करत होते, गोरगरिबांवर अन्याय करत होते म्हणून होता. शिवरायांचा लढा एका अन्यायकारी ताकदीशी होता इस्लामशी नव्हे. म्हणूनच तर त्यांच्या सैन्यात अनेक मुसलमान मावळे होते. इब्राहीम खान हे शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते तर दौलत खान यांच्याकडे कोकण किनारपट्टीच्या रक्षणाची जबाबदारी दिली होती. तर मदारी म्हातर हा त्यांचा अत्यंत विश्वासातला माणूस होता. त्यानेच राजेंची आग्र्याहून सुटका करण्यासाठी जीवाची जोखीम लावली होती. असे अनेक मुस्लीम मावळे आहेत जे शिवरायांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढले. (पानसरे , 2011)

शिवरायांचे स्वराज्य गरीब, रंजलेले, गांजलेले, शेतकरी, स्त्रिया इत्यादी अशा सगळ्यांनाच सन्मानाची वागणूक देणारे आहे. प्रत्येक मावळ्याला त्यांच्या आस्थांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देणारे आहे. उदाहरणादाखल रायगड किल्ल्याच्या बाजूला भगवान जगदीश्वर मंदिराच्या बाजूलाच त्यांनी एक मशीद हि बांधली होती जेणेकरून आपले मुस्लीम मावळे त्यांच्या आस्थेची जोपासना करतील. तसेच अफझल खानची दर्गा शिवाजी महाराज यांनी स्वतः बनवली होती. त्यांच्या मनात अफझल खान विषयी द्वेष नव्हता, मात्र अफझल खान देखील एक आपल्या सारखाच राजा होता हा आदरभाव होता (Puniyani, 2018)

तसेच कोणत्याही प्रकारच्या धार्मिक वस्तूला मग ते कुराण असेल, मस्जिद असेल किंवा कोणत्याही स्त्रियांना कोणत्याही प्रकारची इजा न होण्याची सक्त ताकीद शिवरायांनी मावळ्यांना दिली होती. आणि त्याचे पालन होईल याची ते कठोरपणे दक्षता घेत असत.

तसेच औरंगजेब ज्याला सध्या महराष्ट्रात व्हिलन केला जात आहे, त्याच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे प्रमाण हे २१.६ टक्के होते ते पुढे ३१.६ टक्के इतके वाढले. शहाजहान च्या राज्यात हे हिंदू मनसबदारांचे प्रमाण २२.४ टक्के होते तर अकबराच्या पदरी पाचशेहून अधिक मनसब असणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचे २२.५ टक्के होते. (पानसरे , 2011).

आता जसवंत सिंग हे नाव शिवरायांचा इतिहास वाचणाऱ्यास माहितच असेल. हा इसम अस्सल हिंदू त्यातही राजपूत औरंगजेबाच्या सैन्यात होता. एव्हढेच नाही औरंगजेबाने त्याला दक्षिणेचा सुभेदार नेमले होते. याच राजपूत हिंदू व्यक्तीने शिवरायांना वेगवेगळे डावपेच आणि सैन्याच्या ताकदीमुळे जेरीस आणले होते. त्याने शिवरायांना नामुष्कीचे तह करण्यास भाग पडले. आणि याच्यामुळेच शिवरायांना आणि त्यांच्या चिमुकल्या संभाजीला आग्र्यास कैद व्हावे लागलं. (PAGADI, 1974)

या वरून लक्षात येते कि हे हिंदू विरुद्ध मुस्लीम लढाया नव्हत्या, तर त्या वेगवेगळ्या राज्यांच्या सत्तांच्या लढाया होत्या.

शिवराय हिंदू धर्माचे पालन करीत पण ते धर्मांध नव्हते. त्यांच्या काळात तर धर्म खूप काटेकोरपणे पाळला जायचा आणि म्हणूनच तर एक क्षत्रिय राजा होणे हे तेंव्हाच्या ब्राह्मणवादास मान्य नव्हते. एव्हढेच नव्हे तर एकदा का मुसलमान झाला म्हणजे धर्म सोडला, धर्म सोडला म्हणजे मेला, असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. अशा वेळी देखील बाबाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे मुसलमान सुंता झालेले व मुसलमानांत दहा – पाच वर्षे राहिलेले मराठे शिवरायांकडे आले, तेंव्हा त्यांनी दोघांनाही हिंदू करवून घेतले. लांड्या म्हणून ज्याला हिणवत होते त्या बाबाजी निंबाळकरासोबत कोणीच सोयरिक जुळवण्यास तयार नव्हते, तेंव्हा शिवरायांनी स्वत:ची मुलगी देऊन सोयरिक जुळवली. (पानसरे, 2011)

खरतर शिवराय हे कोणत्याच व्यक्तीचा जाती धर्माच्या नावावर द्वेष करत नव्हते. आपल्याला संविधानाने दिलेल्या धर्म व विश्वास स्वातंत्र्याचे छत्रपती शिवाजी राजेंनी तर १७ व्या शतकातच ते अमलात आणले असल्याचे दिसते. वर नमूद केल्या प्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची ते कटाक्षाने काळजी घेत.

मग जे हिंदुत्ववादी लोक शिवरायांचे नाव घेऊन हिंदुत्ववाद, भगवा झेंडा, औरंगजेब इत्यादीच्या नावे राजनितीकरण करतात ते खरच शिवरायांच्या पावलावर चालत आहेत का? ते इतर धर्मातील लोकांचा त्यांच्या धार्मिक ग्रंथांचा, धार्मिक स्थळांचा शिवरायां प्रमाणे आदर करतात का? शिवरायांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे का? खरतर शिवरायांकडून खूप शिकण्यासारखे आहे, आणि अशा वेळी “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत”असे जेंव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटले तेंव्हा या हिंदुत्ववादी शिवराय प्रेमींना का चीड आली नाही?

अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना होणारे ट्रोलिंग म्हणा किंवा समाज माध्यमांवर पसरवले जाणारे संदेश म्हणा हे खरच शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी आहेत का, त्यांच्या नावावर हिंदुत्ववादी लोक आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी करत आहे?

References

BBC News. (2022, November 28). भगतसिंह कोश्यारी: 5 वादग्रस्त वक्तव्यं आणि महाराष्ट्रातील समांतर सत्ताकेंद्र. Retrieved April 23, 2024, from https://www.bbc.com/marathi/articles/c72nx19k720o

BBC NEWS. (2022, November 28). भगतसिंह कोश्यारी: 5 वादग्रस्त वक्तव्यं आणि महाराष्ट्रातील समांतर सत्ताकेंद्र. Retrieved April 23, 2024, from https://www.bbc.com/marathi/articles/c72nx19k720o

Mandlekar, C. (2022, April 20). महाराजांची भूमिका साकारणा-या चिन्मय मांडलेकरने मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? Hindusthan Post. Retrieved April 22, 2024, from https://www.youtube.com/watch?v=tAa5N9JZV-0

Mandlekar, C. (2024, April 13). Ft.Chinmay Mandlekar | Ajab gajab podcast | EP 42 | Marathi podcast. (A. g. podcast, Interviewer) Ajab gajab podcast. Retrieved April 23, 2024, from https://www.youtube.com/watch?v=azyJnPWPBmQ

PAGADI, S. (1974). Shivaji and Jaising. In S. PAGADI, Chhatrapati Shivaji. Poona: A.A. Kulkarni. Retrieved April 23, 2024

Puniyani, R. (2018, July 25). Shivaji Maharaj | History | Hindu king | by Dr.Ram Puniyani. Retrieved April 23, 2024, from https://www.youtube.com/watch?v=rM8Sc6e7Gr8

पानसरे , ग. (2011). मुसलमान राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार. In शिवाजी कोण होता ? (p. 31). Mumbai: लोकवाङ्मय गृह. Retrieved April 23, 2024

पानसरे , ग. (2011). शिवाजीचे मुसलमान सरदार. In शिवाजी कोण होता? (pp. 28 – 29). लोकवाङ्मय गृह. Retrieved April 23, 2024

पानसरे, ग. (2011). शिवाजी कोण होता? Mumbai: लोकवाङ्मय गृह. Retrieved April 23, 2024

Attachments area

Preview YouTube video महाराजांची भूमिका साकारणा-या चिन्मय मांडलेकरने मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? | Chinmay Mandlekar

Preview YouTube video Shivaji Maharaj | History | Hindu king | by Dr.Ram Puniyani #shivajimaharaj

#ChinmayMandlekar #nehamandlekar #Jahangir #shivajimaharaj #maharashtra #troling #Hindutvawadi #trolling #history

Make a donation to support us

Donate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*