मिथिला राऊत

 मुंबई मध्ये आदिवासी राहतात का? असा जर कोणी प्रश्न केला तर बर्याच जणांचं उत्तर नाही असं येतं आणि तसं उत्तर येणं देखील स्वाभाविक आहे! कारण कुठे रानावनात – जंगलात राहणारे आदिवासी आणि कुठे झगमगीत राहणीमान देणारी आपली मुंबई! पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (TRTI) सर्वेक्षणानुसार मुंबई मध्ये चक्क 222 आदिवासी पाडे आहेत.

त्यापैकी 27 पाड्यांवर मुंबईच्या ‘आरे’ भागात काही आदिवासी समूह राहतात. आता तुम्हाला वाटत असेल कि रोजीरोटी साठी स्थलांतरी झालेले हे आदिवासी असतील, तर तसं मुळीच नाहीय. हे आदिवासी इथलेच स्थानिक असून ते जंगलातच राहतात.

मुंबई म्हटल्यावर, टोलेजंग इमारती, गाड्यांची धावपळ, प्रदूषण, भेसळयुक्त पदार्थ हे चित्र आपल्या नजरे समोर हमखास येते. परंतु याच मेट्रो सिटी चा भाग असणारं आरे, मुंबईचं जणू काही दुसरे रूप आपणास दाखवते. 1300 हेक्टर एवढी जागा व्यापणारे आरे जणू काही हिरवागार शालू पांघरून थाटात उभा असलेला दिसतो. इथे तुम्हाला बिबट्या, वाघ अशा हिंस्र प्राण्यांपासून ससा हरीण असे सर्व जंगली प्राणी पहावयास मिळतील. सापांचं तर विचारूच नका, ते तर तेथील स्थानिकांच्या कुटुंबाचा जणू काही भागच! हे प्राणी वन्य विभागाने इथे सोडलेले नसून ते खरे खुरे रानटी प्राणी आहेत, बरं का! हा अनुभव आरे मधील केल्टी या आदिवासी पाड्याला भेट दिला असता आला.

29 मार्च 2023 रोजी ही भेट “डायव्हर्सिटी इन मुंबई” या कोर्स अंतर्गत सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिसम म्हणजेच सी. एस. एस. एस. या संस्थेने घडवून आणली. मागच्या अहवालात सांगितल्याप्रमाणे हा कोर्स सी. एस. एस. एस. आणि कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने 23 फेब्रुवारी 2023 ते 1 एप्रिल 2023 या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आला होता.

मुंबईचे फुप्फुस म्हणून ओळखले जाणारे हे आरे, मनुष्य प्रण्यासोबातच कित्येक पशुपक्षांचे, जीवजंतूंचे, किड्यामुंग्यांचे, फळाफुलांचे आश्रय स्थान आहे.

आरे मधील आदिवासी:

आदिवासींच्या वस्त्यांना महाराष्ट्रात काही ठिकाणी पोड म्हणतात तर काही ठिकाणी पाडे म्हणतात. महाराष्ट्रील कोकण विभागात आदिवासींचे निवसस्थान ‘पाडे’ म्हणून ओळखले जाते. आरे मध्ये केल्टीपाडा, दामुपाडा, चाफ्याचापाडा, नवशाचापाडा, फुटक्यातळ्याचापाडा, निम्बारपाडा, प्रजापूरपाडा, वणीचापाडा, भूरीखानपाडा, खांबाचापाडा, खडकपाडा, गावदेवीपाडा, हबालपाडा, देवीपाडा, साईबांगोडापाडा, मोरशीपाडा, चरणदेव पाडा, जीवाचापाडा, मोराचापाडा, उलटणपाडा, नवापाडा, नवापाडा २, नांगरमोडीपाडा, डोंगरीपाडा, प्रजापूरपाडा – मॉडर्न बेकरी, जीतोनीचापाडा आणि कंबातपाडा इत्यादी पाडे आहेत. या पाड्यांवर आकाश भोईर, केल्टी पाड्याचे रहिवासी यांनी नमूद केल्याप्रमाणे कातकरी, वारली, मल्हार कोळी, महादेव कोळी, कोकणा, आणि दुबळा इत्यादी प्रकारचे आदिवासी समूह राहतात.

भोईर आरे बद्दल सांगताना म्हणाले कि, सध्या आरे मध्ये आठ ते नऊ हजार आदिवासी लोक राहतात. त्यापैकी 100 ते 120 मल्हार कोळी या आदिवासी समुदयाची कुटुंबे निवास करत असून सरासरी चार लोक प्रत्येक घरात राहतात. म्हणजेच मल्हार कोळी या आदिवासी समुदयाची जवळजवळ 480 इतकी त्यांची लोकसंख्या आरे मध्ये सध्या वास्तव्य करत असल्याचे आपणास समजते. आरे मध्ये वारली समूहाची लोकसंख्या तुलनेने जास्त असल्याचे देखील भोईर यांनी नमूद केले.

आरे मधील आदिवासींचे व्यवसाय:

शेती हा तेथील आदिवासींचा मुख्य व्यवसाय असल्याचे समजले. भात हे तिथले मुख्य पिक असून, भाताव्यतिरिक्त आंबे, काजू, फणस, जाम इत्यादींचे देखील उत्पादन घेतले जाते. वेगवेगळ्या पालेभाज्या, फुल्भाज्या, फळभाज्यांची शेती त्याचबरोबर मोगरा, अबोली इत्यादी फुलांची लागवड देखील केली जाते.

तिथे शेतीच्या आवाराला “वाडी” असे म्हणतात. प्रत्येक शेतकर्याने आपल्या वाडीला वेवेगळ्या रोपट्यांच्या किंवा झाडांच्या साहाय्याने कुंपण केलेले दिसून आले.

भोईर यांच्या घरा समोरच असणाऱ्या त्यांच्या वाडी मध्ये फ्लावर, मिरची, माठ, लिंबू, कोबी, काकडी, कारली, पडवळ, केळी अशी अनेक प्रकारची पिके दिसली. तसेच महागडी म्हणून ओळखली जाणारी मस्त गुलाबी रंगाची रसबेरी कुंपण होऊन, त्यांच्या वाडीचं रक्षण करताना दिसत होती. त्यांच्या घराचा संपूर्ण परिसर शेणाच्या वासाने दरवळत होता. त्याविषयी विचारणा केली असता समजले कि, जवळच म्हशींचे तबेले आहेत, तेथील म्हशींना दिवसातून दोन वेळा धुतले जाते, त्याचे निरुपयोगी पाणी खाली सोडले जाते. ते खाली वाहत येते अगदी विनामूल्य हे सेन्द्रीयखत युक्त पाणी मुबलक प्रमाणात शेतीसाठी उपलबद्ध आहे.

शेतीसोबतच इतर मजुरीची कामेही तिथला आदिवासी करतो. तसेच शहर बाजूला असल्यामुळे सध्याच्या पिढीतील लोक थोडीफार शिक्षित झाल्यामुळे शहरात जे मिळेल ते कामहि करतात.

रूढी परंपरा:

तेथिल आदिवासींच्या परंपरा मला खूपच पुढारलेल्या दिसल्या.

बाळ जन्मल्यावर तिथे पाचवी (बाळाला जन्मून पाच दिवस झाल्यावर) साजरी केली जाते आणि त्याच दिवशी बाळाचे नामकरण होते.

लग्नासारख्या महत्वाच्या समारंभात वधु – वराचे लग्न हे त्या समुदायातील ‘धवलीरी’ म्हणजेच विधवा (ज्या स्त्रियांच्या पतीचे निधन झाले अशा स्त्रिया) स्त्रियांच्या हस्ते होते. किती पुढारलेला विचार आहे न हा! म्हणजे स्वत:ला सुशिक्षित आणि पुढारलेले समजणारे, चक्क विधवा स्त्रियांना अपशकून समाजात, ज्या क्षणी स्त्रियांना वैधव्य येतं त्याच क्षणी समाजात त्याना दुय्यम वागणूक मिळायला लागते. खरतर सर्वच स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळते पण जर ती स्त्री विधवा असेल तर तिचा समाजातील मान असतो त्याहीपेक्षा कमी होतो. म्हणजे हळदी कुंकू साजरा करू शकत नाही. लग्न समारंभात तिला दुय्यम वागणूक दिली जाते. ती स्त्री कुणाची ओटी (नारळ, आणि एक कपडा देऊन सुवासिनीचा सन्मान करणे ) भरू शकत नाही इत्यादी.

तसेच आरे मधील आदिवासींमध्ये लग्नाच्या समारंभात सवासिण स्त्रिया (ज्या स्त्रियांचे पती हयात आहेत अशा स्त्रिया) चौक काढतात. चौक म्हणजे एक चौकोन त्यात वर्हाडी तसेच पाने फळे फुले, प्राणी, निसर्ग इत्यादी आणि त्यांच्या देवांची चित्रे असतात. इथे लग्नासारख्या महत्वाच्या समारंभात, स्त्रिया मुख्य भूमिका बजावताना दिसतात.

जर दोन वेगवेगळ्या समूहातील व्यक्तींचे लग्न झाले उदा. मुलगी वारली समाज आणि मुलगा महदेव कोळी समाजातील असेल तर त्यांचे समाज बदलत नाहीत म्हणजे मुलगी वारली समाजाची आणि मुलगा महादेव कोळी समाजाचा आजन्म ते ज्या समाजात जन्मले त्याच समाजाचे राहणार पण त्यांना होणारे अपत्य मात्र वडिलांच्या समाजातील होतात.

इथेही मुलीचे लग्न झाले म्हणजे ती दिल्या घरची झाली हि जी पुढारलेल्या, शिक्षित समजल्या जाणार्या समाजाची प्रथा आहे ती दिसत नाही.

तसेच जर नवरा बायकोचं पटत नसेल तर ते समुदायातील पंचांपुढे दोघेही आपली मते ठेवतात. पंचांसमोर एकमेकांपासून अगदी सहज काडीमोड घेतात. जर त्यांना इतर कुणासोबत संसार थाटायचा असेल तर ते काडीमोड घेतल्यावर सहज त्या व्यक्ती सोबत राहू शकतात. त्याला पाट लावणे असे म्हणतात.

परंतु सध्या शहरीकरणाच्या प्रभावामुळे आणि जे सुशिकक्षित आहेत अशा काही व्यक्तींनी न्यायालयीन घटस्पोट घेतल्याची माहिती देखील मिळाली. पण असे घटस्पोट घेण्याच्या घटना अगदी तुरळक आहेत.

रुढी परंपरांव्यतिरिक्त कौटुंबिक अत्याचार होतात का असं प्रश्न केलं असता, “प्रकाश भोईर, तेथील स्थानिक आदिवासी म्हणाले कि, ‘आमच्या लोकांना – पुरुषांना माहित असते कि स्त्रिया पुरुषांकडून होणारा अन्याय सहन करत नाहीत. नवऱ्याने जर हात उगारला तर पत्नी हि त्याला पलटवार देते. त्यामुळे ते सहसा बायकोवर शारीरिक हिंसा करत नाहीत. किती शिकण्यासारखे आहे न यातून!

सुसंस्कृत म्हटल्या जाणाऱ्या समाजातातील स्त्री ने जर तिला त्रास देणाऱ्या, तिच्या सोबत शारीरिक हिंसा करणाऱ्या तिच्या नवर्याला प्रतिकार करताना – नवर्यावर हात उगारताना कधी पहिला आहे का हो आपण? आणि चुकून असं दृश्य नजरेस पडलेच असेल तर त्या स्त्रीला काय काय बोलणी खावी लागतात समाजातून?

सन उत्सव:

दिवाळी आणि शिमगा हे दोन सन आरेतील आदिवासींचे मोठे सन आहेत. दिवाळी या सणाला नवीन पिकलेल्या पिकाचा (धान्य) निसर्ग देवाला प्रसाद दाखवून, हे धान्य दिल्या बद्दल त्याचे आभार मानले जातात. देवाची पूजा झाल्यावर नवीन धान्यापासून बनवलेल्या गोड पदार्थाचे कुटुंबातील सर्व व्यक्ती एकाच वेळी सेवन करतात आणि दिवाळी साजरी करतात.

वसंत ऋतू मध्ये येणाऱ्या आंबा फळाचे स्वागत होळी या सणाने केले जाते. या ऋतूमधील आंब्याचा निसर्ग देवाला प्रसाद दाखवतात आणि मगच आंब्याचे सेवन केले जाते.

सध्या पाड्यांवर शहरीकरणाचा प्रभाव होत असल्यामुळे. गेल्या दहा वर्षांपासून गणेशोस्तव साजरा करतात. काही मित्रमैत्रिणी हिंदू आहेत, ते हा सन साजरा करतात, या सणामध्ये प्रसन्न वातावरण असते त्यामुळे सन साजरा करत असल्याचे कारण समजले.

शिक्षण, आरोग्य सुविधा आणि दस्तऐवज:

येथील आदिवासींचे दहावी हे जास्तीत जास्त शिक्षण आहे. आताच्या पिढीतील अगदी काहीच तरुण तरुणी उच्च शिक्षण घेत असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे आदिवासी असल्याची ओळख पटवून देणारी त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्यामुळे अनेक सोईसुविधांपासून त्यांना वंचित राहावे लागते. पूर्वी पासून घरे कुडाची व छप्पर झाडांच्या फांद्यांपासून किंवा गवतापासून बांधलेले असल्यामुळे पावसामध्ये कागदपत्रे हरवून गेली. तर काही जनांना त्यांचे महत्व माहित नसल्यामुळे कागदपत्रे काढलीच नाहीत.

आरोग्य सुविधांची तर पड्यांवर खूपच चनचन आहे. पाड्यांवर रस्ते नसल्यामुळे कुणी आजारी पडल्यास तिथे वाहतुकीची सुविधा उपलाबद्ध नाही, विशेषतः गरोदर स्त्रियांसाठी हे खूपच जोखीमिचे आहे.

आदिवासिंसामोरील समस्या:

  1. शासनाचे विविध प्रकल्प

खरतर पूर्वी आरे हा मुंबईचा भाग नव्हता. गोरेगाव (पूर्व) येथील आरे मिल्क कॉलनीची स्थापना 1949 मध्ये झाली. 1951 मध्ये आरे येथील डेअरीचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुंबई विस्तारित गेली आणि आरे आपोआपच मुंबईचा भाग म्ह्नणून ओळखले जाऊ लागले.

निसर्ग रम्य हिरवागार आरे हे गेल्या काही वर्षांपासून बातम्यांमध्ये येत असल्याचे आपणास माहित आहे. त्याचे कारण म्हणजे तेथील स्थानिक तसेच मुंबईकरांनी मेट्रो 3 कारशेड प्रकल्पालाला दर्शवलेला विरोध.

या विरोधाचे मुळ 2014 मध्ये प्रीथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमत्री होते तेव्हा त्यांनी, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो प्रकल्पासाठी, 33.5 किमी भूमिगत मेट्रोचे डबे धुण्याची आणि देखभाल करण्यासाठी आरे मिल्क कॉलनी येथे सुविधा उभारण्याच्या योजनेचा प्रस्थाव मांडला होता, त्या प्रस्थावात दिसते. 30 हेक्टर इतका भाग मुंबई मेट्रो लाइन-3 प्रकल्पासाठी विकास क्षेत्रांतर्गत गेले. हा प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) – भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम राबवत असून, त्याच वर्षी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि पूर्ववर्ती योजनेनुसार या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला. (Sumeda, 2022)

परंतु या प्रकल्पासाठी हजारो झाडांची तोड होणार असल्या कारणाने स्थानिक आदिवासी, पर्यावरण प्रेमी आणि इतर नागरिकांनी देखील या प्रकल्पास कठोर विरोध दर्शवला व सेव्ह आरे हि चळवळ चालू झाली. हजारो लोक त्यात सामील झाले होते अशी माहिती प्रकाश भोईर, मल्हार कोळी या आदिवासी समूहातील केल्टी पाड्याचे रहिवाशी यांनी दिली. या चळवळी मध्ये ते व त्यांची पत्नी सक्रीय देखील होते. शासनास प्रश्न विचारल्या मुळे चळवळीमध्ये सामील झालेल्या कित्येक लोकांना अटक झाली होती. त्यात प्रमिला भोईर, त्यांची पत्नीचा देखील समावेश होता.

2019 मध्ये उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री झाल्यावर या प्रकल्पास स्थगित आणली होती. (Dhupkar & Marpakwar, 2019) . 2022मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी आल्यावर पुन्हा मेट्रो कर शेड चे काम सुरु झाले. (ANI, 2033)

विकासाच्या नावावर अशाप्रकारे शासन मेट्रो कार शेड सारखे प्रकल्प आदिवासी भागात आणत असल्या मुळे कित्येक झाडांच्या कत्तली कराव्या लागतात. स्थानिक आदिवासींच्या म्हणण्या नुसार निसर्ग आपला समतोल राखत या भागातील पशु पक्षांना लाभदायक अशाच झाडांची आपोआप लागवड करतो. त्यावर हजरो पक्षी, जीवजंतू कीटक आपला उदार्निर्हाव करतात. परंतु शासन एकाद्या प्रकाप्लासाठी कित्येक झाडे तोडते आणि त्या बदल्यात शासनाला योग्य वाटेल अशा झाडांची लागवड करते, जे कि येथील स्थानिक परीसंस्थांच्या जीवन साखळीस अपायकारक आहे.

नको ती बंगला गाडी, माझी बरी आहे शेती वाडी!!

नको तुझी बिल्डींग भारी, माझी झोपडीच माझी माडी रं!!

असं गाणे सदर करत प्रकाश भोईर यांनी शासनाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचा त्यांना कसा त्रास सहन करावा लागत आहे हे सांगितले. सध्या आरे मध्ये वर नमूद केलेल्या आरे कार शेड प्रकल्पाचा त्यांना खूप त्रास होत असल्याचे सांगितले. शासन आम्हाला वेवेगळी अमिषे दाखवून आमची जमीन घेत आहे. पण आम्हाला सरकारची घरे, एस. आर. ए बिल्डींग मधली घरे, काहीच नको आम्हाला आमची जमीन, पक्षी, झाडे, कीटक किडे मुंग्या हा आमचा सगळा परिवार आमच्या सोबत हवा आहे. त्यासाठी आमच्या हिरव्या देवाचे – निसर्गाचे रक्षण होणे गरजेचे आहे. आरे फक्त आम्हालाच ओक्सिसाजन देत नाही तर मुंबईतील लोकांना देखील देते. त्यामुळे हे जंगल वाचले पाहिज, असे ते म्हणाले.

  1. धर्मांतरण:

ख्रिश्चन मिशनरी तसेच वनवासी सारख्या संस्था यांच्या प्रयत्नांमुळे काही आदिवासी धर्मांतरणाचे शिकार होत असल्याचे आकाश भोईर यांनी सांगितले. अगदी शुल्लक अशी शिक्षण किंवा पाणी पुरवठा याची सुविधा पुरवणे हे धर्मांतरणाचे कारण समजले. वनवासी संस्था आदिवासिंना हे पटवून देत आहेत कि, तुम्ही आदिवासी नाहीत तुम्ही वनात राहणारे वनवासी आहात.

परंतु सध्या आदिवासी समुदायामध्ये, समुदायाकाडूनच जनजागृती होत आहे. आम्ही आदिवासी आहोत आणि आदिवासी हाच आमचं धर्म आहे. हिंदू, मुस्लीम किंवा ख्रिश्चन असं कोणताही आमचं धर्म नाही असे तेथील आदिवासी म्हणत आहेत.

आकाश भोईर यांच्या 12वि लिविंग सर्टिफ़िकेट वरती हिंदू म्हल्हार कोळी असे त्यांना न विचारातच लेहिले आहे.

  1. शहरीकरण:

आरे मुंबईचा भाग असल्यामुळे आरेतील आदिवासींच्या राहणीमानात, खानपान तसेच बोलीभाषेवारती शहरीकरणाचा प्रभाव दिसून येत आहे. तसेच बिगर आदिवासिदेखील आरेमध्ये कमी किमतीला घर मिळत असल्यामुळे स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे आणि कचऱ्याचे व्यवस्थापन नसल्यामुळे दुर्गंधीची समस्या उद्भवत आहे तसेच आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे.

त्याच प्रमाणे बिगर आदिवासींना जंगली प्राणी आजूबाजूला असेल तर ते कसं ओळखायचे याचे ज्ञान नसल्यामुळे जंगली प्राणी त्यांच्यावर हल्ला करतात. त्यामुळे त्यांच्या भ्रमंतीवर बंदी घालण्याची मागणी बिगर आदिवासींकडून येत आहे.

अशाप्रकारे आगळेवेगळे मुंबईचे रूप बघितल्यावर विद्यार्थी अगदी भारावून गेले होते. जंगलांचे आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे, जंगलामुळे आपल्याला श्वास घेता येतो त्यामुळे त्याचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे असे विद्यार्थी म्हणाले म्हणाले, तर जंगल हे जंगली पशुपक्षांचे घर आहे, त्यांना तिथे राहायला मिळाले पाहिजे, आपल्या स्वार्थासाठी आपण त्यांच्यावर अन्याय करू नये असे अश्विनी, एक विद्यार्थिनी म्हणाली.

#DiversityinMumbai #CSSS #adivasiculture #Adivasi #Education #learning #Society

 

 

 

Make a donation to support us

Donate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*