मिथिला राऊत
04/03/2023
“मुस्लीम लोक हे हिंसक असतात हा जो माझा मुस्लीम लोकांविषयी समाज होता तो माहीम दर्ग्याला दिलेल्या भेटीमुळे दूर झाला.” असं अश्विनी, कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन या कॉलेज मध्ये शिकत असलेली डिप्लोमा इन सोशल वर्क ची विद्यार्थिनी म्हणाली.
आपले मत व्यक्त करताना पुढे ती म्हणाली कि, “अभ्यासाचा भाग म्हणनू मी माहीम दर्ग्याला भेट देण्यासाठी आले खरी, पण हे इथले मुस्लीम लोक आपल्यावर हल्ला तर करणार नाहीत ना! अशी शंका मनात होतीच. ती शंकेची पाल मनात घेऊनच दर्गा विषयी माहिती जाणून घेण्यासाठी दर्ग्याच्या मॅनेजमेंट ऑफिस मध्ये पाय ठेवला. तिथंलं प्रत्यक्षातलं चित्र काही वेगळच दिसलं. ऑफिस मधील मुस्लीम लोकांनी आमचं खूप आदराने स्वागत केलं. आम्ही विद्यार्थी आहोत आणि दर्गा विषयी अभ्यास करायला आलो आहोत, हे कळताच त्यांनी आम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपुलाकीने दिली. जास्त माहिती जाणून घेण्यासाठी दर्गाविषयी माहिती छापलेली पुस्तिका त्यांनी आम्हाला दिली. एकंदरीत माझ्या डोक्यात सामाजिक माध्यमांनी आणि समाजाने जे मुस्लीम समाजातील लोकांविषयी चित्र निर्माण केलं होतं ते पूर्णपणे उलटं असल्याचं माझ्या लक्षात आलं.”
अश्विनीने “डायव्हर्सिटी इन मुंबई” या कोर्स अंतर्गत माहीम दर्गाला २४ फेब्रुवारी २०२३ रोजी भेट दिली असून हा कोर्स सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिसम आणि कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या भेटी मध्ये 11 विध्यार्थी सामील झाले होते.
शुक्रवार च्या त्या गर्दीत दर्ग्यामध्ये बुरखा घालून नमाज पडत असणाऱ्या मुस्लीम धार्मिक समुदायातील स्त्रीया दिसल्या. त्याचप्रमाणे हिंदु धार्मिक समुदायातील महिला देखील डोक्यावर पदर घेऊन, पनती पेटवून हात जोडून अगदी भक्ती भावाने प्रार्थना करत असल्याच्या दृष्टीस पडल्या. माहीम दर्ग्याच्या बाहेर असणाऱ्या रंगेबिरंगी फुले, चादर तसेच डोक्यावर घेण्यासाठी असणार्या ओढण्यांप्रमानेच दर्ग्याच्या आवारातील चित्र देखील रंगीत दिसत होते.
रेणुका, डायव्हर्सिटी इन मुंबई या कोर्सचा भाग असलेल्या एका महिलेने सांगितले कि, मनात असणाऱ्या सर्व इच्छा इथे आल्यावर पूर्ण होतात, पण मी हिंदु धार्मिकस्थळांना देखील तितक्याच भक्तिभावाने भेट दते, शेवटी हा प्रत्येकाच्या विश्वासाचा प्रश्न आहे त्याला धर्माचं लेबल देऊ नये.
दर्गाच्या मॅनेजमेंट कमिटीशी बोलल्यावर हे समजले कि, दर्ग्याला मिळणाऱ्या दानरूपी पैशातून गरिबांना वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवली जाते. हि सुविधा कोणत्याही धार्मिक समुदायातील लोकांसाठी मर्यादित नसते. तसेच दरवर्षी उरूस हा दहा दिवसांचा सन मोठ्या उत्साहात दर्ग्यामध्ये साजरा केला जातो. त्यात चादर चढवण्याचा पहिला मान हा मुंबई पोलिसांचा असतो, असे मॅनेजमेंट कमिटी ने सांगितले.
त्याचबरोबर थोडीशी खंत व्यक्त करत डायव्हर्सिटी इन मुंबई या कोर्समध्ये सहभागी झालेल्या शुभांगीने आपले निरीक्षण नोंदवले कि, दर्ग्यामध्ये महिलांना परवानगी दिली जात नाही, अजूनही मुस्लीम धार्मिक समुदायातील लोक महिलांना दुय्यम वागणूक देतात.
दर्ग्याबाहेरील दुकाने मुस्लीम धार्मिक समुदायातील लोकांची दिसून आली. परंतु ज्या प्रमाणे सिद्धिविनायकला गेल्यावर तेथील दुकानदार जेवढ्या अपुलीकीने भाविकांची चप्पल हरवू नये म्हणून त्यांना आपल्याच दुकानात चप्पल काढावयास सांगतात अगदी तीच आपुलकी येथील दुकानदारांमध्ये देखील दिसून आली. सोबतच महिलांना दर्गामध्ये जाण्यासाठी डोक्यावर घ्याव्या लागणाऱ्या ओढनीची देखील ते अगदी मोफत व्यवस्था करून देतात. हिंदु, मुस्लीम, ख्रिश्चन व इतर सर्वच धार्मिक समुदायातील लोक दर्ग्याला भेट देतात अशी माहिती दुकानदारांकडून मिळाली.
मुंबईमध्ये जवळजवळ भारतातील सर्वच प्रांतातील लोक वास्तव्य करत असल्यामुळे आपण मुंबईला मिनी इंडिया म्हणून ओळखतो. मुंबई मध्ये सांस्कृतिक, भाषिक, प्रांतीय व इतर विविधते सोबतच धार्मिक विविधता अगदी सहजच आपण बघू शकतो. धार्मिक प्रतीके म्हणून बांधण्यात आलेल्या मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, अग्यारी, विहार इत्यादी आपल्या सहजच दृष्टीस पडतात.
हीच धार्मिक विविधता समजून घेण्यासाठी माहीम दर्गा पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या माहीम चर्च ला भेट देण्यात आली.
जवळ जवळ ३०० माणसे मावतील इतक्या प्रशस्त चर्च मध्ये अंदाजे वीस एक भाविक भक्ती भावाने प्रार्थना करत असल्याचे चित्र दिसले. प्रत्येकजण आपल्याला हव्या त्या पद्धतीने प्रार्थना करत होता. काही जन येशू समोर हात जोडत होते, काही जन मुस्लीम रीतिरिवाजाप्रमाणे हात पुढे करत होते, काही जन डोकं टेकवत होते तर काही जन अगदी शांत बसून आपली प्रार्थना येशूला सांगत होते. त्या शांत चर्च मध्ये येशूची प्रतिमा देखील तितकीच शांत आणि जात – पात, धर्म – पंत, उच्च – नीच असा कसलाही भेदभाव न करता, सर्व भाविकांना आपल्या कवेत घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना आशा देणारी दिसली.
चर्चच्या बाहेरील दुकानदार विविध धर्मातील आढळून आले. हिंदू, मुस्लीम ख्रिश्चन अशा सर्वच धार्मिक समुदायातील लोक चर्च ला भक्ती भावाने भेट देतात असे तेथील एका दुकानदाराने तसेच चर्चचे सुपरवायझर, मा. रोद्रीग्स यांनी सांगितले.
सामुहिक प्रार्थनेचे स्वरूप सांगताना म्हणाले रोद्रीग्स कि, इथे येणारे भाविक त्यांच्या इच्छा एका कागदावर लिहितात आणि एका पेटीत टाकतात, सामुहिक प्रार्थनेच्या वेळी त्या चिठ्ठ्या माईक वर वाचल्या जातात. भाविकांनी बर्याच चमत्कारांचा अनुभव घेतल्यामुळे वर्षानुवर्षे ते चर्च ला भेट देत असल्याचे देखील ते म्हणाले.
दर बुधवारी जवळ जवळ ३०० लोकांना चर्च मधून जेवणाची व्यवस्था केली जाते. तर वैद्यकीय, समुपदेशन तसेच शैक्षणिक सुविधा देखील गरिबांसाठी चर्च मधून पुरवली जाते. तसेच चर्च मधील ९०% स्टाफ हा हिंदु असून १०% स्टाफ हा ख्रिश्चन असल्याची माहित रोद्रीग्स यांच्याकडून मिळाली.
अशाप्रकारे मुंबईतील धार्मिक स्थळे मुंबईच्या वैविध्यपूर्ण सौंदर्यात भर पाडत असल्याचे आपणास दिसून येते. पण खरच आपल्या समोर या धार्मिक स्थळांविषयी सत्य माहिती येते का? कि आपण देखील अफवांवर विश्वास ठेऊन आहोत? याचा विचार करून आपल्या धार्मिक – सांस्कृतिक ऐतिहासिक वारश्याविषयी जास्तीत जास्त सत्य माहिती जाणून घेणे, हे आपले एक जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य आहे.
हीच मुंबईतील धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, लैंगिक इत्यादी अशी विविधता लोकांपर्यंत खास करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, आपल्या जीवनात विविधतेचं असणारं महत्व त्यांना पटवून द्यावं, यासाठी सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिसम जवळ जवळ गेल्या नऊ वर्षांपासून डायव्हर्सिटी इन मुंबई हा कोर्स आयोजित करत आली आहे. या कोर्सचा मुख्य उद्धेश हा मुंबईमधील विविधता लोकांना अनुभवण्यास लावणे तसेच या विविधते विषयीची अभ्यासपूर्ण माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवणे हा आहे.
जवळ जवळ एक ते दीड महिन्यांचा हा कोर्स असून, आतापर्यंत सेंट झेवियर्स, सोफिया कॉलेजे फॉर वोमेन, विल्सन कॉलेज, एस. आय. इ. एस कॉलेज इत्यादी कॉलेज सोबत आयोजित करण्यात आला आहे. या कोर्स अंतर्गत चोर बाझार, भेंडी बाझार, वसई, मनी भवन, आरे – आदिवासी पाडे, सिद्धिविनायक मंदीर, माहीम दर्गा, माहीम चर्च इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्या जातात.
तसेच विविधता: संस्कुती आणि ओळख; मुंबईतील सामाजिक चळवळी; मुंबईचा इतिहास; लिंग आणि विविधता अशा अनेक विषयांवर वाख्याने देखील ठेवली जातात. व्याख्याने देण्यासाठी प्रा. अरविंद गणाचारी, डॉ. राम पुनयानी, तुषार गांधी, प्रा. नीरा आडारकर, एड. इरफान इंजिनिअर, प्रा. कामाला गणेश, प्रा. चयनिका शाह अशा नावाजलेल्या आणि त्या त्या क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करत असलेल्या व्यक्तींना आमंत्रित केले जाते.
सध्या हा कोर्स २३ फेब्रुवारी ते १ में २०२३ या कालावधी मध्ये कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन या कॉलेज सोबत आयोजित केला गेला असून त्यात १५ विद्यार्थी सामील झाले आहेत. पुढील भेटींचा अहवाल देखील आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.