मिथिला राऊत
08/03/2023
चोर बाजार म्हटलं कि, सर्वांच्याच नजरे समोर येतं चोरीचा माल विकत असणारा बाजार किंवा हमखास पाकीट चोरीस जाणारी जागा. खरंतर माझाही समज हाच होता. पण तुम्हाला माहिती आहे का? हे ठिकाण पूर्वी शोर बाजार या नावाने ओळखले जायचे ते! ही माहिती दिनांक २ मार्च २०२३ रोजी या ठिकाणाला भेट दिली असता, चोर बाजारातील विंटेज कलेक्शन या दुकानाचे मालक दिलावर यांनी दिली. ही भेट “डायव्हर्सिटी इन मुंबई” या कोर्स अंतर्गत सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिसम म्हणजेच सी. एस. एस. एस. या संस्थेने घडवून आणली. मागच्या अहवालात सांगितल्याप्रमाणे हा कोर्स सी. एस. एस. एस. आणि कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने २३ फेब्रुवारी २०२३ ते १ एप्रिल २०२३ या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
शोर बाजार वरून चोर बाजार हे नाव कसे झाले याचं स्पष्टीकरण देताना दिलावर म्हणाले कि, पूर्वी ब्रिटीश राणी या मार्गावरून राणीच्या बागेत जायची तेंव्हा इथे खूप आवाज व्हायचा. या होणाऱ्या मोठ्या आवाजवरूनच इंग्रजांनी या जागेला शोर बाजार असे नाव दिले. पण पुढे त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन “चोर बाजार” हे नाव पडले. त्याच्या या स्पष्टीकारानास इतर दुकानदारांनी देखील पुष्टी दिली.
तर सध्याच्या या चोर बाजारात सर्वच दुकाने हि मुस्लीम समुदायातील लोकांच्या मालकीची दिसतात. या दुनाकांमध्ये पितळेची, तांब्याची, स्टील ची अशा सगळ्याच धातूंची भांडी, गळ्यातले हार, शोकेजच्या वस्तू, टेलीफोने, टायीप रायटर, गाड्यांचे वेगवेगळे पार्ट, कोच अशा अनेक निरनिराळ्या वस्तू दिसतात. तिथे दिसणरे गळ्यातले वेवेगळ्या धातूंचे, दगडांचे हार, घरात सुशोभीकरणासाठी लावले जाणारे झुंबर लोकांचे लक्ष वेधून घेतात. आश्चर्य म्हणजे मुस्लीम समुदायातील लोकांच्या मालकीच्या असणाऱ्या दुकांनामध्ये हिंदू देवदैवतांच्या मुर्त्या तसेच फोटो विकण्यासाठी असल्याचे दिसले.
चोर बाजाराच्या मध्यातच एक शाफी नावाची मस्जिद आहे. तेथे फक्त सुन्नी समाजातील लोकच नमाज पडायला जातात, असे तेथील एका दुकानदाराने सांगितले. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास “अल्ल्हः हो अकबर…” अशी अझान कानी पडली तत्पूर्वी तेथील बहुतेक दुकानदार नमाज पडण्याच्या लगबगीत दिसले. त्या मशीदीवर एक गरुड बसल्याचे दिसले. दिलावर, तेथील एक दुकानदार म्हणाले कि, ‘अझान होणे के समय ये गरुड हर रोज आके वहा बैठता ही, क्यू आता है नही पता, पर बिना भूलके इस समय वह जरूर आता है|’
तेथील जवळ जवळ सर्वच दुकानदार म्हणाले कि, इथल्या वस्तूंना फिल्म इंडस्ट्री मधून जास्त मागणी आहे. वेगवेगळ्या धातूंची, मातीची भांडी तसेच हिंदू दैवतांच्या मुर्त्या व फोटो विकणारा दुकानदार म्हणाला कि, एखादी वस्तू जेवढी जुनी तेवढी त्याची किंमत जास्त. लाखाच्या घरात काही वस्तू विकल्या जात असल्याचे त्याने सांगितले.
आपल्या डोळ्यासमोर मुंबई म्हणजे मोठ्या मोठ्या टोलेजंग इमारती त्यामध्ये असणारे मॉल्स, नवीन कपडे घालून, डोळ्यांना गोगल लाऊन स्टाईल मारत फिरणारे लोक हे चित्र येतं. पण चोर बाजार हे सगळं खोडून टाकतं. तिथे गेल्यावर वेल्डिंग करणारे, वस्तू साफ करणारे अशी मेहनतीची कामे करणारे लोक दिसतात. अर्थातच काही दुकानदार इस्त्रीचे कपडे घालून दुकानाच्या खुर्चीत बसलेले देखील दिसतात. त्यांच्या डोक्यात चोवीस तास व्यवसाय चालतो हे त्यांच्या “पैसा रखो और माल लेके जाओ, हम यहा माहिती देणे के लिये नही बैठे हैं ‘या वाक्यावरून समजते.
परंतु या काही दुकानदारांचं राहणीमान सोडता पूर्ण चोर बाजार बघितला तर त्यातून जणू काही एका जुन्या वास्तूचा सुगंध येतो असे वाटते. ब्रिटीशांच्या काळापासून असणाऱ्या या बाजाराने मुंबईच्या सौंदर्यात भर पाडली आहे. भारातातून तसेच विदेशातून देखील लोक येथे वस्तू खरेदी करण्यास येत असल्याचे तेथील बर्याच दुकानदरांनी सांगितले.
चोर बाजाराच्या बाजूलाच बोहरी मोहल्ला आहे. तेथे देखील चोर बाजार प्रमाणेच दुकानांची गर्दी होती. परंतु तेथील बरीचशी दुकाने क्लस्टर रीडेव्हलोपमेंट या प्रकल्पाच्या अंतर्गत तोडली गेली आहेत. या प्रकल्पाअंतर्गत तेथे टोलेजंग इमारती बांधून तेथे या दुकानदारांना त्यांचा व्यवसाय करण्याची जागा देण्याचे ठरले आहे. किंबहुना काही लोकांना तेथे बांधलेल्या इमारतींमध्ये दुकाने मिळाली देखील आहेत. काही दुकानदार या प्रकल्पाचा स्वीकार करत आहेत तर बऱ्याच दुकानदारांनी या प्रकल्पामुळे त्यांच्या धंद्यावरती परिणाम होत असल्याचे सांगितले. तेथील एका ग्राहकाचे यावर मत विचारले असता, तो म्हणाला कि, टोलेजंग इमारतींनी या दुकानांच्या वस्तीची जागा घेतली तर मॉल मध्ये आणि येथील स्थानिक बाजारामध्ये काहीच फरक राहणार नाही. इथल्या जागेचं सौंदर्य निघून जाईल.
बोहरा मोहल्ला मधली सगळीच दुकाने खाद्य पदार्थांची दिसली. जास्त प्रमणात विक्रीस असणारे गोड पदार्थ, बोहरा समाजावारती गुजराती संस्कृतीचे असणारे प्रभुत्व दाखवत होते. जो मुस्लीम समाज कमी शिक्षित त्यातही स्त्रियांच्या शिक्षणाला प्राधान्य न देणारा म्हणून ओळखला जातो त्याचाच एक भाग बोहरा समाज, या समाजातील इथल्या स्त्रिया मात्र पांढरा शुभ्र किंवा रंगेबिरंगी बुरखा घातलेल्या, असल्खीत इंग्रजी बोलणाऱ्या, स्कूटर चालवत असणाऱ्या दिसल्या. अत्तराची असणारी मोठाली दुकाने बोहरा समाजातील लोकांच्या शान शौकीच्या जीवनशैलीचे दर्शन घडवत होती.
या बोहरी मोहल्ल्या मध्ये एक छोटा इमाम वाडा दिसला. तेथे असलेल्या आरिफ नावाच्या एका व्यक्तीने सांगितले कि, लखनऊ मध्ये जो बडा इमाम आहे त्याच्या बहिणीची इथे पूजा केली जाते. इथे हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मातील लोक भेट देतात.
बोहरी मुहाल्ल्याच्या थोडं पुढे गेल्यावर नळ बाजार दृष्टीस पडतो. नळ बाजारात किराणा माल, बांगड्या, ड्रायफ्रुट्स, वेगवेगळे नळ अशा दैनंदिन जीवनातल्या सगळ्याच वस्तू विक्रीस असलेल्या पहावयास मिळतात. मुस्लीम समाजातील लोकांच्या मालकीच्या दुकानात हिंदू देव दैवतांना पुजण्याच्या वस्तू देखील दिसत होत्या. इथल्या बहुतांशी इमारती ह्या जुन्या दिसत होत्या.
नळ बाजारात येईपर्यंत ६ वाजले होते. सूर्याची कोवळी किरणे नळ बाजारात फाकली होती. दुकानदार विक्री करण्यात, ग्राहक खरेदी करण्यात मग्न झालेले दिसत होते. मध्येच रस्त्यातून एक मेंढी कशाचीही परवा न करता रस्त्याच्या मध्यातून चालली होती. मुंबईत सहजासहजी पहावयास न मिळणाऱ्या त्या मेंढी कडे विद्यार्थी अगदी कुतूहलाने बघत होते. काहीजण तीचे फोटो काढत होते.
नळ बाजारात खाद्य पदार्थांची दुकाने तुरळक दिसली. एका गल्लीतील तर सर्वच दुकाने शाकाहारी पदार्थ विकणारी दिसली. मुस्लीम बहुसंख्य असणाऱ्या नळ बाजारातील त्या एका गल्लीत एकही मांसाहारी पदार्थ विकणारे दुकान नसल्याचे कारण तेथील एका सात्यनारायणाच्या मंदिराची सेवा करत असणाऱ्या प्रतिभा नावाच्या स्त्री ने सांगितले. ती स्त्री म्हणली कि, हा भाग पूर्ण मुस्लीम बहुसंख्य असणारा आहे. परंतु सर्व मुस्लीम हे बोहरा समाजातील आहेत आणि जे हिंदू आहेत ते सर्वच ब्राह्मण, जैन आणि मारवाडी समुदायातील असल्यामुळे इथे मांसाहारी पदार्थ विकले जात नाही.
या मुस्लीम बहुसंख्य प्रभागात, मस्जीदिन्प्रमाणे, हिंदू धार्मिक स्थळे- मंदिरे देखील अगदी रुबाबात उभी असलेली दिसतात. १९९२ च्या सांप्रदायिक दंग्यांबद्दल बोलताना ती स्त्री म्हणली कि, “तो एक महिना खूपच भयानक होता. आजही त्या दिवसांची आठवण झाली कि, अंगावर शहारे येतात. सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. आम्ही एक महिना मंदिरातून बाहेर पडलो नव्हतो. बरेचशे हिंदू धार्मिक समुदयातील लोक जीव वाचवण्यासाठी हा भाग सोडून बोरीवली, कांदिवालीला वास्तव्यास गेले. तर काही आपल्या मायदेशी परतले. बाबरी मस्जिद तोडली गेल्यामुळे त्याचा बदला म्हणून या सत्यनारायणाच्या मंदिरावर मुस्लीम धार्मिक समुदायातील लोक हल्ला करत होते. आमच्या कडून त्यांना प्रतिकार दिला जात नव्हता मात्र पुढच्या गल्लीतून शिवसेनेचे लोक त्यांना प्रतीकार करत होते. आमच्या गल्लीतील बोहरा समुदायातील मुस्लीम, आमचे शेजारीच होते ते आम्हाला ओळखत होते. त्यांनी आमच्यावर हल्ला केला नाही. तसाही बोहरी समाज हा शांतता प्रिया असतो. हा दंगा घडवण्यामागे त्या दुसर्या गल्लीतील दुसरे मुस्लीम लोक होते. दंग्याच्या आधी हिंदू मुस्लीम लोक सगळे सण उत्सव एकत्र साजरे करायचे मात्र आता तसे होत नाही.”
प्रत्येक बाजारात वेगवेगळ्या मुस्लीम समुदायाच्या वेगवेगळ्या मशिदी दिसल्या. बोहरा, सुन्नी, शिया हे मुस्लीम एकमेकांच्या मशिदीत नमाज पडण्यासाठी जात नसल्याची माहिती तेथील स्थानिक लोकांकडून मिळाली. बर्याचशा मुस्लीम दुकानदारांना असल्खीत हिंदी, गुजराती, मराठी भाषा बोलता येत असल्याचे दिसले.
अशा विविधतेने समृद्ध असलेल्या मुंबईतील एक छोट्याश्या भागाला भेट दिल्यावर या कोर्स मध्ये सामील असणाऱ्या आठही विद्यार्थ्यांनी खूपच आश्चर्य व्यक्त केलं. मुस्लीम समुदायातही एवढ्या वेगवेगळ्या जाती असतात हे पहिल्यांदाच कळले असं अश्विनी म्हणाली. तर इंग्लिश बोलणार्या मुस्लीम स्त्रिया त्यातही पांढऱ्या बुरख्यातील वेशभूषा असणाऱ्या मुस्लीम स्त्रिया पहिल्यांदाच पाहिल्याचे गीता म्हणाली. तर चोर बाजारामध्ये आतंकवादी राहतात तिथे संध्याकाळी चार वाजल्या नंतर कोणी सामान्य माणूस जाऊ शकत नाही हे जे मी लोकांकडून ऐकले असल्यामुळे हा जो माझा समाज होता तो दूर झाला, असे शुभांगी म्हणाली.