मिथिला राऊत
29/01/2024
श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा दिवस २२ जानेवारी २०२४ रोजी देशभर खूप उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान मोदींनी या दिवसास एक दिवसाची दिवाळी असे संबोधले आणि लोकांनी देखील त्या भावनेने रामाची पूजा केली. जय श्री राम च्या घोषणा देत ठिकठिकाणी मिरवणुका निघालेल्या देखील दिसल्या. बोलता बोलता सहज माझा एक मित्र म्हणाला, “हि तर सुरुवात आहे, पुढे तर बघ सगळीकडे मंदिरे दिसतील.
”खरतर मंदिरे असणे हि चांगलीच गोष्ट. कोणतेही धार्मिक स्थळ आपल्याला मानसिक रित्या शांत, प्रसन्न आणि संकटावर मात करण्यासाठी ताकद देत असल्याची एक भावना आपल्या मनात निर्माण करतं, हे आपण रोजच्या जीवनात अनुभवतोच. पण सगळीकडे मंदिरे दिसतील, हे वाक्य मात्र मला, त्या उंदरा सारखे वाटले, जो उंदीर आपण गाढ झोपेत असताना रात्री गुपचूप येऊन आपल्याला सुगावा हि न लागू देता आपला पाय कुरतडतो, आणि दुसऱ्या दिवशी मोठी जखम झाल्याचे आपल्या लक्षात येते. त्या उंदराच्या कुरतडन्या प्रमाणे हिंदू समुदयातील लोकांच्या मनात आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ आणि इतर कनिष्ट असा विचार हिंदुत्ववादी विचारसारणीच्या लोकांकडून राजकीय हेतूसाठी बिंबवला तर जात नसेल न?
खरतर हि शंका येण्याचं कारणही तसच आहे. मुंबईतील मिरवनुकीतील लोकांमध्ये भक्तीभाव कमी आणि काहीतरी जिंकल्याची भावना जास्त दिसत होती. तसेच सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम या संस्थेच्या २०२३ च्या अहवालानुसार, वेगवेगळ्या सामुदायिक गटांमध्ये द्वेष निर्माण होईल असे शासकीय आणि अशासकीय व्यक्तींकडून दिलेल्या द्वेष जनक भाषणांचे प्रमाण भारतात वाढलेले दिसते. महाराष्ट्रात तर, वर्तमान पत्रात नमूद केल्या प्रमाणे नव्हेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत ठिकठिकाणी “हिंदू सकल समाज“ द्वारे 50 मिरवणुका काढण्यात आल्या. काही मिरवणुकांची तर वर्तमान पत्रात नोंद घेतली गेली नाही. या मिरवणुकांमध्ये मुस्लीम समाजा विषयी द्वेष जनक भाषणे दिली गेली, लव्ह जिहाद, जमीन जिहाद अशा संकल्पना सर्वसामान्यांमध्ये बिंबवण्यासाठी मुस्लीम समुदायातील लोकांवर, आर्थिक सामाजिक बहिष्कार करण्यात यावा असे स्पष्ट द्वेषजनक भाषणे देण्यात आली. त्यात टी. राजा सिंह, काजल हिंदुस्थानी अशा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांचा समावेश होता, त्या मिरवणुकां मध्ये भाजपच्या नेत्यांनीही उपस्थिती दर्शवल्याचे दिसले होते. हे सर्व समाजात द्वेष पसरवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.
सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम या संस्थेच्या अहवालानुसार, या द्वेषाचे रुपांतर म्हणून २०२३ मध्ये भारतात ३२ आणि महाराष्ट्रात ११ सांप्रदायिक दंगली झाल्याचे दिसते. खंत व्यक्त करण्याची गोष्ट म्हणजे ज्या रामाची आपण जल्लोषात पूजा करतोय, त्या रामाचा जन्मदिवस म्हणून रामनवमी आपण साजरी करतो, त्या दिवशी २०२३ मध्ये भारतात एकूण 9 सांप्रदायिक दंगली झाल्या आहेत. महाराष्ट्रात राम नवमीच्या दिवशी मुंबई आणि छत्रपती संभाजी नगर या दोन ठिकाणी दंगली झाल्या, त्यात छत्रपती संभाजी नगर येथे एकाला जीव गमवावा लागला. तर २०२२ मध्ये भारतात एकूण ४१ पैकी १९ दंगली फक्त रामनवमीच्या दिवशी झाल्या होत्या. असे देशात २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत एकूण २८ दंगली या राम नवमीच्या दिवशी झाल्या आहेत.
खरतर राम, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखला जातो. भगवान राम चा चेहराच इतका प्रसन्न आहे कि, त्याकडे दृष्टी जाताच प्रेम, शांती हे शब्द आपसूकच तोंडात येतात. नीतिमान, सत्यवचनी, अत्मवाचनी (ज्याच्याकडे असीम धर्य आहे) चरित्रसंपन्न, विद्वान, सामर्थ्यशाली, जिताक्रोध (ज्याने क्रोधावर विजय मिळवला आहे) , प्रियदर्शी इत्यादी गुणांनी राम संपन्न होता असं आपण म्हणतो किंबहुना असा आपला विश्वास आहे. याच रामाच्या जन्म दिवसाच्या म्हणजेच रामनवमीच्या दिवशी रामाच्या नावाने दंगली होणे त्यात निष्पापांचा बळी जाने हे खरच दुखद आहे. अशा परिस्थितीत शासन किंबहुना कोणताही मंत्री या हिंसेचा विरोध करण्यास पुढे येत नाही, यावर चाकर शब्द देखील काढत नाहीत, रामाच्या नावाने हिंसा होऊ नये असे म्हणताना देखील दिसत नाहीत.
हे चित्र बघून बऱ्याच जागरूक नागरीकांना चिंता वाटायला लागली आहे. खरतर एक माणूस म्हणून, आपण सर्वच जन एकमेकांवर अवलंबून आहोत. व्यक्तीला जगण्यासाठी समाजाची आवश्यकता असते मग त्या समाजातील लोक कोणत्याही जाती धर्मातील असतील. मुंबईत तर एका बिल्डींग मध्ये किंवा चाळी मध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. अशा वेळी कुणाला जर दुखापत झाली, काही संकट ओढवले तर ती व्यक्ती कोणत्या जाती धर्माची आहे हे पहिले जात नाही, तर ती व्यक्ती आपली शेजारी आहे आणि आपण शेजार धर्म पाळला पाहिजे, असं म्हणून ते त्याला मदत करतात. त्याच प्रमाणे बरेचशे व्यवसाय हे एकमेकांशी जोडलेले आहेत. या व्यवसायांत असणाऱ्या व्यासायीकांची धार्मिक, जातीय ओळख हि भिन्न असते.
महात्मा गांधीनी म्हटल्या प्रमाणे सर्वच धर्मात एक नैतिकरित्या जबाबदार माणूस बनवण्याची मुल्ये, तत्वे आहेत.
खरतर प्रत्येक व्यक्तीने आपापल्या धर्मातल्या मुल्यांचा, तत्वांचा अंगीकार करून एक चांगला समाज बनण्यास सहकार्य करत असतो आणि समाजाप्रती असणाऱ्या सामाजिक बांधिलकीने आपल्या समाजातील लोकांशी बंधुतेने, एकतेने आणि शांती पूर्ण राहण्याचा प्रयत्न करत असतो हे आपण सगळेच रोजच्या जीवनात अनुभवतो. मुंबईत तर एका वेळी हजारो लोक लोकल ट्रेन मधून रोज प्रवास करत असतात, बोट जाईल इतकाही वाव नसतो तरी देखील, कोचमध्ये जास्तीत जास्त लोक कसे मावतील आणि सगळे वेळेत कामावर कसे पोहोचतील अशा प्रयत्नात सगळे दिसतात, अशावेळी कुठेच जात, धर्म, पंथ इत्यादी भेदभाव दिसत नाहीत.
खरतर भारतात वेगवेगळ्या जातीधर्मांचे लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदत आहेत, विविधतेत एकता हा आपला वारसा आहे. इग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंदू, मुस्लीम, शीख अशा विविध धर्मातील लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी संघर्ष केला हे आपणा सर्वांस माहित आहे.
त्यामुळेच मानत धार्मिक तेढ निर्माण होऊ न देता आपला विविधतेत एकता हा वारसा जपने, त्याला आणखी समृध्द करणे हे भारताचे एक नागरिक म्हणून आपणा प्रत्येकाचे कर्तव्य आहे.