Press Note:

१८ जुलै २०२५

मुंबई प्रेस क्लब

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी झुंडीने गडावर गेलेल्या तथाकथित शिवभक्तांनी, गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील मुसलमानवाडीवर हल्ला करून तेथील ४२ घरे उद्ध्वस्त केली. या रहिवाशांचा गडावरील अतिक्रमणांशी अजिबात संबंध नव्हता. या घटनेला १४ जुलै २०२५ रोजी वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम (सीएसएसएस), सलोखा संपर्क गट आणि असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स (एपीसीआर) या संस्थांनी एकत्रितपणे ‘विशाळगड धार्मिक राजकारणाचे नवे पर्व!’ हा सत्यशोधन अहवाल प्रकाशित केला आहे.

या प्रसंगी माजी न्यायमूर्ती मा. अभय ठिपसे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

एक वर्ष झाले तरी पिडीतांना न्याय मिळालेला नाही. भरपाई दिली ती अगदी जुजबी होती आणि तीदेखील सर्वांना मिळालेली नाही. त्यांची घरे फोडली, सोने लुटले, पैसे लुबाडून नेले. हल्ल्याचे लक्ष्य अतिक्रमण नसून गजापुरची मुसलमानवाडी होती. पोलिसांना या धोक्याची कल्पना असतानादेखील त्यांनी कोणतीही दक्षता घेतली नाही. जमावबंदी असतानादेखील पोलिसांनी मिरवणुकीतील लोकांना गडावर जाऊ दिले. सरकारकडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विशाळगड आणि औरंगजेब यांबद्दल केलेली भाषणे यांमुळे हल्लेखोरांना एक प्रकारे बळच मिळाले. अद्यापही प्रमुख गुन्हेगार पकडले गेले नाहीत. व्यवस्थित चौकशी झालेली नाही. एस.आय.टि. द्वारे उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली रीतसर चौकशी होऊन गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, असे सीएसएसएस चे संचालक इरफान इंजिनियर म्हणाले.

विशाळगडावरील मलिक रेहान दर्ग्याच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांमुळे येथील पंचक्रोशीला रोजगार मिळतो. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादाचा परिणाम दर्ग्याच्या पर्यटनावर झालेला आहे. त्यामुळे रोजी-रोटीच्या शोधात अनेक कुटुंबे या परिसरातून विस्थापित झाल्याची माहिती शांतीसाठी स्त्री संघर्ष मंच, कोल्हापूर या संस्थेतर्फे रेहाना मुरसल यांनी दिली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वरकरणी धार्मिक तणावाचे मुद्दे उकरून काढले जात आहेत, त्यांच्या मुळाशी आर्थिक हितसंबंध असल्याचे निरीक्षण सलोखा संपर्क गटातर्फे संपत देसाई यांनी नोंदवले.

हे सर्व प्रकरण अतिशय प्रक्षोभक सोशल मीडिया प्रचारामुळे पेटत गेले व त्याची परिणीती गजापुरातील हिंसाचारात झाली. याप्रकरणी माजी खासदार संभाजी राजे यांचे नाव एफ.आय.आर. मध्ये ठळकपणे असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दंगलखोरांसकट द्वेषमूलक भाषणे करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी याप्रसंगी सीएसएसएसच्या वतीने मिथीला राऊत यांनी केली.

याप्रसंगी एपीसीआर या संस्थेचे मुंबईचे कार्याध्यक्ष असलम गाझी यांनी जागोजागी धार्मिक तणावाचे मुद्दे उकरून काढून अल्पसंख्य समाजाची सामाजिक आणि आर्थिक कोंडी केली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

या अहवालाचे प्रकाशन मुंबई प्रेस क्लब येथे पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा गावडे यांनी केले.

Make a donation to support us

Donate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*