मिथिला राऊत

 04/02/2023

२९  जानेवारी २०२३ रोजी मुंबईतील दादर येथे सकल हिंदू समाज, मुंबई तर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने नमूद केल्या प्रमाणे या मोर्चात  जवळ जवळ दहा ते बारा हजार लोक सामील झाले होते. भाजपचे तसेच बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या काही नेत्यांनीही या मोर्चास उपस्थिती दर्शवल्याचे वृत्तपत्रांमध्ये वाचावयास मिळाले. (Eeshanpriya MS , Shubhangi Khapre, 2023)

जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत तरुणांपासून वृद्धांपर्यंत लोक या मोर्चात सहभागी झालेले दिसत होते. तर “हे दुर्गे तू लक्षी बन, तू काली बन परंतु कभी न बुरखेवाली बन”, “धर्म छोडकर जायेगी, तुकडो में काटी जाओगी “, “अब्दुल हो या आफताब सबने पढी है एक किताब”  असे पोस्टर दिसत होते. हे पोस्टर्स एका विशिष्ठ समुदायाला लक्ष्य करत असल्याचे दिसते.

तसेच वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या माहिती नुसार खास या मोर्चासाठी तेलंगणावरून आलेले आमदार राजासिंह म्हणाले कि, “हिंदू तरुणींनो कोणतीही वस्तू ही हिंदू व्यक्तीच्याच दुकानातून खरेदी करा. हलाल प्रमाणपत्र असलेल्या वस्तू फेकून द्या, कारण या माध्यमातून तुमचे पैसे हे तुम्हालाच मारण्यासाठी पुरवले जातात. याचसोबत हिंदूंनो व्यायामशाळेत गेल्यावर प्रशिक्षण हे हिंदू व्यक्तीकडूनच घ्या आणि हिंदू तरुणींनो नृत्यवर्गात गेल्यावर नृत्यसुद्धा हिंदू व्यक्तीकडूनच शिका. याचबरोबर दर रविवारी आपल्या सोसायटीत किमान एक तास वर्ग घ्या आणि त्यात कोणासोबत मैत्री करायची आणि कोणाशी मैत्री नाही करायची, याची शिकवण द्या. जेणेकरून आपल्या तरुणी लव्ह जिहादच्या बळी पडणार नाहीत’”. (Loksatta, 2023)

एकंदरीत या मोर्चाचा रोख हा ‘हिंदू धार्मिक समुदायातील स्त्रियांना एका विशिष्ठ धर्मातील पुरुषांकडून धोका आहे आणि त्यामुळे त्या विशिष्ठ धर्मातील पुरुषांशी त्यांना लग्न करण्यापासून परावृत्त करून, स्वधर्मातील पुरुषांकडून काहीच धोका नसल्यामुळे त्यांनी लग्नासाठी फक्त स्वधर्मातील पुरुषांचीच निवड करावी, असा संदेश देणारा दिसत होता.’

पण खरच, दुसर्या धार्मिक समुदायातील सर्वच पुरुषांकडून हिंदु धार्मिक समुदायातील स्त्रियांना धोका आहे आणि स्वधर्मातील एकाही पुरुषाकडून त्यांना धोका नाही असं आहे का?

आपण खालील काही घटनांवर नजर टाकू.

  • नोव्हेंबर २०२२ मध्ये अचानक गायब झालेल्या महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील सदिच्छा साने या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा खून करून तिचे प्रेत मुंबईतील वांद्र्याच्या (बांद्रा) समुद्रात फेकून दिल्याची कबुली मिथु सिंग या इसमाने काही दिवसांपूर्वीच दिली आहे. (Vishal Singh, 2023)
  • धार्मिक नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या आसाराम बापूने २००१ ते २००६ या काळात त्याच्याच आश्रमातील महिलेवर बलात्कार केल्याचे सिद्ध होऊन गांधीनगर कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. (Hindustantimes, 2023)
  • दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुरुमीत राम रहिमला २०१८ मध्ये २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Loksatta, 2018)
  • २२ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील लिंबेगाव गावातील, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या शुभांगी जोगदांड या युवतीचे, नातेवाइकातील तरुणावर प्रेम असल्याचे कळताच तिच्याच कुटुंबातील पुरुषांनी तिची हत्या केली आणि तिच्या खुनाचा ठावठिकाना लागू नये म्हणून शेतातच तिच्या प्रेताची विल्हेवाट लावली.(Mirror Now Digital, 2023)
  • (एनएफएचएस – ५) २०१९-२०२१ च्या अहवालानुसार सर्वेक्षणाच्या आधीच्या १२ महिन्यांत २७.५ % हिंदू महिला त्यांच्याच पती किंवा जोडीदाराकडून भावनिक, शारीरिक, लैंगिक अत्याचारास बळी पडल्या आहेत.(Mithila Raut, 2022)

दादर येथील हिंदू जण आक्रोश मोर्चा मध्ये वरील पैकी एकातरी घटनेवर भाष्य केले आहे का? कोणत्याही वृत्तपत्रात याबाबत नमूद केल्याचे  दृष्टीस पडले नाही किंवा समाजमाध्यमांतून ऐकावयास देखील मिळाले नाही. मग हा सगळा खटाटोप खरच हिंदू धार्मिक समुदायातील स्रियांच्या संरक्षणासाठीच आहे का?

का महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या लव्ह जिहाद विरोधी कायदा अंमलात आणण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आहे ?

कि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बी.एम,सी) आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जास्त मते आकर्षित करण्यासाठी आहे?

या सगळ्या प्रश्नांवरून आणि वर नमूद केलेल्या घटना पाहता एकच लक्षात येते कि, हिंदू धार्मिक समुदायातील मुलींच्या रक्षणाच्या नावाखाली त्यांनी कुणाशी बोलावे, कुणाकडून शिक्षण घावे, कुणाशी मैत्री करावी इत्यादी सर्व निर्णय पूर्णपणे  पुरुषांच्या हातात जातील. किंबहुना आजही बहुतांशी हे निर्णय पुरुषसत्ताक समाजाच्याच हातात आहेत.

सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, फातेमा शेख, पंडिता रमाबाई, राजा राम मोहन रॉय इत्यादी अशा अनेक समाजसुधारकांनी, समाजाच्या अर्ध्या वाट्याला – स्त्रीला समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून घेतलेले कष्ट आणि संविधानाने स्रियांना दिलेले अधिकार डावलून हिंदू स्त्रियांच्या रक्षणाच्या नावाखाली पुन्हा त्यांच्या पायात बेड्या तर घालण्यात येणार नाहीत ना?

पण सध्या हिंदू धार्मिक समुदायातील स्त्रियांचा फक्त सुरक्षितेचाच प्रश्न भेडसावत आहे का? आजही हिंदू धार्मिक समुदायातील किंबहुना सगळ्याच धार्मिक समुदायातील स्त्रियांना कुटुंबात आणि समाजात समानतेची वागणूक मिळते का? कुटुंबात – समाजात त्यांचा निर्णय प्रक्रियेत समान सहभाग असतो का?

एकंदरीत कोणत्याही जाती – धार्मिक समुदायातील स्त्रीने फक्त सुरक्षित असण्यामध्ये आणि तिला कुटुंबात आणि समाजात सन्मानाने वागणूक मिळणे यामध्ये खूप फरक आहे.

खरंतर स्त्रिला तिच्या सुरक्षिततेची हमी देण्याची, तीला सन्मानाची वागणूक देण्याची जबाबदारी राज्या सोबतच कुटुंबाची, समाजाची, स्त्रियांची, पुरूषांची एकंदरीत आपणा सर्वांचीच आहे.

जर कोणी स्त्री सोबत उभे राहत नसेल तर प्रथम  तिलाच तिच्यासाठी उभं राहावे लागेल. महिलांसाठी काम करणाऱ्या संघटना देखील महिलांचे प्रश्न उभे करतात. महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल तर शासनाला जाब विचारात. आणि त्यांना न्याय मिळवनु देण्यासाठी लढतात.

त्यामुळेच कोणत्याही धार्मिक समुदायातील स्त्रीच्या  रक्षणासाठी , तिला  कोणताही धोका न पोहोचण्यासाठी तिच्यावर  बंधने न घालता, तिला  माणसाची पारख करण्यास शिकवणे, तिच्या हक्कांबद्दल तिला माहिती करून देणे, एखादी समस्या आलीच तर तिचे निवारण करण्यासाठीचे तिला मार्ग दाखवणे, त्याच बरोबर धार्मिक, सांस्कृतिक, प्रांतीय इत्यादी संस्कारांसोबत उच्च शिक्षण देऊन तिच्या पायावर तिला उभे करून तिला सक्षम करण्याची आवश्यकता आहे.

References

Eeshanpriya MS , Shubhangi Khapre. (2023, January 30). The Indian Express. Retrieved February 2, 2023, from https://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-hundreds-march-love-jihad-laws-religious-conversion-8411289/

Hindustantimes. (2023, January 31). Retrieved February 2, 2023, from https://www.hindustantimes.com/india-news/asaram-gets-life-term-in-sexual-assault-case-in-gujarat-101675163108866.html

Loksatta. (2018, October 5). Retrieved February 2, 2023, from https://www.loksatta.com/desh-videsh/gurmeet-ram-rahim-granted-bail-by-panchkula-cbi-court-in-castration-case-he-will-remain-in-jail-in-connection-with-the-rape-case-1765626/

Loksatta. (2023, January 2023). Retrieved February 2, 2023, from https://www.loksatta.com/mumbai/hindu-organisations-organise-a-massive-jan-aakrosh-morcha-against-love-jihad-mumbai-print-news-zws-70-3430787/

Mirror Now Digital. (2023, January 27). Retrieved February 2, 2023, from https://www.timesnownews.com/mirror-now/crime/honour-killing-in-maharashtra-girl-killed-body-burnt-and-remains-disposed-in-drain-father-among-4-held-article-97379519

Mithila Raut. (2022, December 31). Loksatta. Retrieved February 2, 2023, from https://www.loksatta.com/sampadkiya/features/domestic-violence-women-and-religion-asj-82-3368764/

Vishal Singh. (2023, January 20). The Free Press Journal. Retrieved February 2, 2023, from https://www.freepressjournal.in/mumbai/mumbai-mithu-singh-arrested-for-mbbs-student-sadichha-sanes-murder

 

 

Make a donation to support us

Donate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*