मिथिला राऊत
काही दिवसांपूर्वी एक वर्गमित्र भेटला होता. गरम गरम चहा पीत कॉलेज मधल्या आठवणींमध्ये आम्ही रमलो होतो. बोलता बोलता लग्नाचा विषय आला. त्याने विचारलं काय मग लग्न कधी करतेयस.
शोध मुलगा माझ्यासाठी, मी म्हणाले. बोल काय अपेक्षा आहेत तुझ्या. जातीची, धर्माची काय अट? जात अट नसल्याचे मी सांगितले. म्हणजे त्यावर त्याने विचारले मुसलमान पण चालेल तुला? मी हो म्हणाले. त्यावर त्याचं अगदी अनपेक्षित वाक्य ऐकायला मिळालं. ते म्हणजे “बघ हं 36 तुकडे होतील”. हे वाक्य ऐकताच आमच्या मस्करीत चाललेल्या संभाषणाने कधी गंभीरता घेतली कळलंच नाही.
मी म्हणाले असं काही नसतं, मी तुला असे हिंदु – मुस्लीम जोडपे दाखवेन जे एकमेकांवर कोणत्याही प्रकारची बळजबरी न करता चांगला २० एक वर्षांचा सुखाचा संसार केलाय.
तो म्हणाला ते असेल तरीपण आपलाच धर्म बरा, कशाला उडती तीर घ्यायची.
“उडती तीर घेण्याचा प्रश्न नाही, अशा मस्करीत बोलण्यावरून लोकांची तशी मते बनत जातात, हे म्हणायचंय. आणि तसाही श्रद्धा वालकर केस व्यतिरिक, इतर केस पण आहेत ज्या मिडिया मध्ये जास्त झळकल्या नाहीत किंवा लोकांपर्यंत पोहोचल्या नसाव्यात.” मी म्हणाले.
गरम गरम चहा सोबत आता डोकंहि गरम झालं होतं. दोघांचेही मतभेद झाले. शेवटी एवढा मस्करीत चालेला विषय गंभीरते कडे वळत आहे याची जाणीव होताच दोघंही शांत झालो अन विषय बदलला.
पण “बघ हं 36 तुकडे होतील” हे त्याचं वाक्य काही डोक्यातून जाईना.
श्रद्धा वालकर हत्ये नंतर बर्याच जणांच्या तोंडून वेगवेगळी विधाने ऐकली होती. काही जन म्हणत होते हे मुस्लीम असेच असतात निर्दयी, विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत हे. तर काही जन म्हणत होते श्रद्धा ची चूक आहे तिने का लिव्ह इन मध्ये रहायचं?
पण खरच एखादी व्यक्ती एखाद्या धार्मिक समुदायाची असल्यामुळे, किंवा लिव्ह इन रिलेशन मध्ये असल्यामुळे एवढी क्रूर असते असं म्हणणं बरोबर आहे का?
मागच्या काही महिन्यामध्ये वर्तमान पत्रांमध्ये आलेल्या काही हत्येच्या बातम्यांचा आढावा घेऊ, एक म्हणजे नोव्हेंबर २०२२ मध्ये कोलकता मधील उज्ज्वल चक्रवर्ती, माजी नौदलाचे कर्मचारी, यांची हत्या त्यांचीच पत्नी आणि मुलाने केली. प्रेताचे सहा तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. (Sweety Kumari, 2022)
तसेच दुसर्या केस मध्ये वाराणसी मधील पट्टी गावातील प्रिन्स यादव (२४) याने त्याच्या कुटुंबियांच्या मदतीने त्याच्या एक्ष प्रेयसीची हत्या केली आणि प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी २२ तुकडे केले. (Rajeev Dikshit, 2022)
नोव्हेंबर २०२२ बदनामीच्या भीतीने वडील आणि चुलत्यानेच 17 वर्षाच्या मुलीला फाशी देऊन जाळून टाकल्याची संताप जनक घटना चंदनझीरा पोलीस ठाणे अंतर्गत जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव शिवारात घडली आहे. बोहल्यावर चढवण्यासाठी झालेली सर्व तयारी सोडून मुलीला फासावर चढविले. (edtvjalna, 2022)
22 वर्षीय मुस्लिम तरुणाने आपल्या अल्पवयीन बहिणीचे गैर-मुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून हत्या केली. हत्येनंतर, त्याने उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कटरा बाजार पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले, (Times of India, 2022)
वर नमूद केलेल्या घटनांवरून आपल्या हे लक्षात येते कि, एखाद्या विशिष्ट नात्यातील व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा खून करते असं नाही. त्यामुळे लिव्ह इन सारख्या नात्यामध्येच क्रूरतेने माणूस वागतो आणि लग्नासारख्या सात जन्मासाठी बांधलेल्या नात्यामध्ये हत्या होऊ शकत नाही असं नाहीय.
आता कौटुंबिक हिंसाचारामध्ये महिलांना जीव गमवावा लागला अशा काही बातम्यांचा आढावा घेऊ.
मे २०२२ मध्ये उत्तर प्रदेश मधील पिलिभीत जिल्ह्यातील जहाँबाद पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येणाऱ्या अडवली गावातील ३० वर्षीय महिलेची हत्या हुंड्यासाठी तिच्याच पतीने केली. (Keshaw Agrawal, 2022)
तर मे २०२२ मध्ये महाराष्ट्रातील जालना मधील गणेश सातारेने, कौटुंबिक वादावरून पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची भारती सातारे, ३६ तिच्या लेकी सह डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. (Maharashtra Times, 2022)
श्रद्धा वालकर हत्याकांडाने १९९५ मध्ये तंदूर केस म्ह्णून गाजलेल्या प्रकरणाची आठवण झाली. सुशील शर्मा आणि नैना सहानी हे देखील लिव्ह इन रेलशन मध्ये राहत होते. परंतु ओव्हर पझेसिव्ह असल्यामुळे व्यभिचाराच्या संशयावरून आरोपी सुशील शर्मा याने नैना हिची रागाच्या भरात हत्या केली. तिच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मांस तंदूर करण्याच्या ओव्हन चा वापर केला होता. (Heemani Bhandari, 2018)
वर नमूद केलेल्या घटनांवरून कोणत्याही धार्मिक समुदायातील पुरुषाकडून हिंसा होऊ शकते हे दिसून येते. व्यक्ती कडून होणारी हिंसा हि व्यक्तिगत आहे. त्यामुळे एखाद्या विशिष्ठ धार्मिक समुदायातील व्यक्तीच निर्दयी असतात असं म्हणणं चुकीचा ठरेल.
वास्तविक श्रद्धा वलकर चे खून प्रकरण डोमेस्टिक व्हायलंस चा प्रकार आहे. परंतु त्याला ‘लव्ह जिहाद च्या नावाखाली राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत.
अहो एकदा जीव गेल्यावर तुम्ही त्या निर्जीव बॉडी चे दोन तुकडे करा ३६ तुकडे करा किंवा १०० तुकडे करा त्याने त्या जीव गेलेल्या व्यक्तीला काय फरक पडणार. श्रद्धा सोबत घडलं ते वाईटच आहे, कोणत्याच स्त्री सोबत किंबहुना व्यक्तीसोबत असं घडू नये, पण ज्या स्त्रिया त्यांच्या त्यांच्या घरात रोज मरत असतात, त्यांना विचारलं तर कळेल मेल्यावर ३६ तुकडे झालेले बरे का रोज घुसमटत जगणे बरे.
मुद्दा हिंदू किंवा मुस्लिम धार्मिक समुदायातील पुरुष, स्त्रियांवर अत्याचार करतात एवढाच नाहीय तर तो अत्याचार स्त्रिया निमूटपने सहन करतात आणि त्या हिंसेस समाजही दुजोरा देतो हा आहे.
नवऱ्याने मारलं तर काय झालं तो नवरा आहे, तो मरणारच तू आता त्याची आहेस तो तुझ्याशी हवं तसं वागेल. लग्न झालं आता, तू आमची नाहीस, असं म्हणून माहेरचे देखील महिलेवर पुरुषांकडून होणाऱ्या हिंसेला कळत नकळत पाठिंबा देतात.
अशा कितीतरी स्त्रिया रोज मरत असतानाच्या दिसतात. काही फक्त ती स्त्री जन्माला अली म्हणून, काही हुंड्यासाठी, काहींना मुलगा होत नाही म्हणून, काहींचा नवरा बेवडा आहे म्हणून, तर काही स्वतः पैसे कमावत नाहीत म्हणून इत्यादी. या पुरुषसत्ताक समाजात स्त्रीला फक्त दुय्यमच वागणूक मिळत नाही तर तिला रोज त्रास सहन करावा लागतो. तिला रोज मारहाण सहन करावी लागते. तिला रोज लैंगिक छळास सामोरे जावे लागते. हे दुःख एकदा मरण्यापेक्षा खूप जड असतं.
नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे चा डेटा पाहता आपल्या हे लक्षात येतं कि बऱ्याच महिला या त्रासास सामोऱ्या जात असतात.
नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे (एन एफ एच एस – 5) 2019 – 2021 रिपोर्ट अनुसार एकोणतीस टक्के 18-49 वयोगटातील महिलांनी वयाच्या 15 वर्षांपासूनच शारीरिक हिंसा अनुभवली आहे, आणि 6 टक्के महिलांनी कधीही लैंगिक हिंसाचाराचा अनुभव घेतला आहे, तर तीन टक्के महिलांनी गर्भवती असताना शारीरिक हिंसा अनुभवली आहे. (National Family Health Survey (NFHS – 5), 2019 – 21, 2022)
बरं हा अत्याचार हिंदू किंवा मुस्लिम धर्मसमुदयातच दिसून येतो असे नाही. तो हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध – नव बौद्ध, जैन व इतर अशा सर्वच धर्मसमुदायांमध्ये दिसून येतो.
सर्वेक्षणाच्या आधीच्या 12 महिन्यांत शारीरिक हिंसा अनुभवलेल्या हिंदू महिलांची टक्केवारी 29.7, मुस्लिम 26.1 ख्रिश्चन 22.6, शीख 11.7, बौद्ध – नव बौद्ध 29.5 , जैन 18.2, तर इतर 30.7 इतकी आहे. (National Family Health Survey (NFHS – 5), 2019 – 21, 2022)
तर कोणत्याही पती/ जोडीदाराकडून भावनिक, शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराचा अनुभव घेतलेल्या 18-49 वयोगटातील कधीही विवाहित महिलांची टक्केवारी हिंदू 27.5, मुस्लिम 25.1, ख्रिश्चन 21.8, शीख 10.0, बौद्ध – नव बौद्ध 28.4, जैन 3.8, तर इतर 21.5 अशी आहे. (National Family Health Survey (NFHS – 5), 2019 – 21, 2022)
एखाद्या अंतर धर्मीय कौटुंबिक हिंसेकडे लोकांचे लक्ष वेधून एकोणतीस टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांना त्रास सहन करावा लागतो त्याकडे दुर्लक्ष करायचं का? इतर कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं सामान्य आहेत, त्या छळास बळी पडणं स्त्रीचं साहजिकच आहे असं म्हणून चालेल का? कि फक्त परधर्मिय पुरुषाने आपल्या मुलीवर अन्याय करायचा नाही, आणि स्वधर्मातील पुरुषाने केला तरी चालेल, असं आहे?
वरील डेटा पाहता हे लक्षात येते कि कोणत्याही धार्मिक समुदायातील पुरुषांकडून महिलांवर अत्याचार होऊ शकतो. त्यामुळेच लग्न करताना तो मुलगा कोणत्या धार्मिक किंवा जातीच्या समुदायातला आहे या पेक्षा त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची मानसिकता कशी आहे, स्त्री – पुरुष सामानते विषयी त्याची काय धारणा आहे, इत्यादी गोष्टी विचारात घेणे जास्त महत्वाचे आहे.
Bibliography:
edtvjalna. (2022, December 14). Retrieved December 24, 2022, from https://edtvjalna.com/2022/7401/
Heemani Bhandari. (2018, December 22). The Hindu. Retrieved December 2022, 2022, from https://www.thehindu.com/news/cities/Delhi/tandoor-murder-i-regret-murdering-naina-sahni-says-sushil-sharma/article25809161.ece
Keshaw Agrawal. (2022, October 15). TOI. Retrieved December 2022, 24, from Times of India: https://timesofindia.indiatimes.com/city/bareilly/uttar-pradesh-30-year-old-woman-killed-for-dowry-in-pilibhit/articleshow/94885933.cms
Maharashtra Times. (2022, May 16). Retrieved December 24, 2022, from https://maharashtratimes.com/maharashtra/jalna/murder-of-second-wife-and-minor-daughter-by-husband-with-the-help-of-first-wife-in-jalna/articleshow/91601122.cms
National Family Health Survey (NFHS – 5), 2019 – 21. (2022, March). Retrieved December 24, 2022, from http://rchiips.org/nfhs/NFHS-5Reports/NFHS-5_INDIA_REPORT.pdf
National Family Health Survey. (2022, March). Retrieved December 2022, 2022, from http://rchiips.org/nfhs/NFHS-5Reports/NFHS-5_INDIA_REPORT.pdf
Rajeev Dikshit. (2022). UP: Azamgarh man held for strangling ex-girlfriend, cutting body into pieces. varanasi: TOI. Retrieved December 20, 2022, from https://timesofindia.indiatimes.com/city/varanasi/up-azamgarh-man-held-for-strangling-ex-girlfriend-cutting-body-into-pieces/articleshow/95647267.cms
Siraj Qureshi. (2022, November 23). India Today. Retrieved December 24, 2022, from India Today: https://www.indiatoday.in/crime/story/woman-found-dead-in-trolley-bag-on-yamuna-expressway-killed-by-father-for-marrying-against-his-choice-2300509-2022-11-23
Sweety Kumari. (2022). Ex-Navy man killed by wife and son, body chopped into six parts. Retrieved December 2022, from https://indianexpress.com/article/cities/kolkata/ex-navy-man-killed-by-wife-and-son-body-chopped-into-6-parts-8279878/
Times of India. (2022, November 4). Retrieved December 26, 2022, from https://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/boy-kills-sis-for-talking-to-youth-in-neighbourhood/articleshow/95289959.cms