मिथिला राऊत
31/01/2023
सिटिझन्स फॉर द कॉन्स्टिट्यूशन (सी. एफ. टी. सी) आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी (सी.एस.एस.एस), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी २०२३ रोजी ” नफरत कि दिवार में प्रेम का सुराख़” हा कार्यक्रम कोहिनूर सिटी मॉल, कुर्ला येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जवळ ८० लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात तुषार गांधी, महात्मा गांधींचे पणतु, लेखक आणि कार्यकर्ता; मिहीर देसाई, मानवाधिकार अधिवक्ता (झूम द्वारा उपस्थिती), डोल्फी डिसुझा, अध्यक्ष – बॉम्बे काथोलिक सभा आणि जमात ए इस्लामी शी जोडलेले डॉ. सलीम खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वकील, सामाजिक कार्यकर्ते, जर्नालीस्ट तसेच ख्रिश्चन, मुस्लीम आणि हिंदु अशा विविध धार्मिक समुदायातील जवळ जवळ 80 लोक या कार्यक्रमात सामील झाले होते होते.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधानिक तसेच लोकशाहीच्या मुल्यांसोबत प्रेमाचा संदेश पोहोचवत एक सुजाण नागरिक बनवणे हा होता.
जात – पात, धर्म – पंत, गरीब – श्रीमंत यांच्या पलीकडे जाऊन प्रेमाने मानसं जोडण्याच्या या मोहिमेत जास्तीत जास्त लोक जोडले जाण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती साठी वेगवेगळे ट्रेनिंग, लव्ह फेस्टिवल, तरुणांना लीडरशिप वर्कशॉप, धर्म किंवा श्रद्धा स्वातंत्र्य यावर कार्यशाळा, संविधानावरती चर्चा सत्र इत्यादी कार्यक्रम २०२३ या वर्षात सी. एफ. टी. सी. द्वारा आयोजित करण्याचे उपस्थितांनी तसेचं आयोजकांनी मिळून ठरवले.
सध्या सोशल मिडिया, वृत्तप्तत्रे यांमधून द्वेषमय संदेश फिरत असताना आपल्याला दिसतात. काही राजकीय लोक स्वार्थासाठी, नागरिकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करून लोकांची मने भडकवत असल्याचे आपण बघत आहोत. याच द्वेषमय वातावरणावर आपले मत मांडताना तुषार गांधी म्हणाले कि, “द्वेष हा दृश्य असो वा अदृश्य तो माणसाला बदलतोच. आज प्रेमाच्या कवडस्याची नाही तर द्वेषाची भिंती पाडण्यासाठी सुरुंगाची ची आवश्यकता आहे. आपण जो पर्यन्त प्रेमाने दरी भरत नाहीत तोपर्यंत द्वेषाची दरी वाढतच राहील.”
तथा “संविधानाचे रक्षण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मानवाधिकारचे उल्लंघन होईल असे धर्मांतरं वीरोधी, लव्ह जिहाद, एन.आर. सी, सी. ए. ए. सारखे शासन कायदे आणत आहे. या सगळ्याचा संबंध आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. भारत जोडण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. मानवाधिकार उल्लंघन होईल असे शासनाचे निर्णय असतील तर आपण शासनाला प्रश्न विचारले पाहिजेत. त्याचा विरोध करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.” असे मत संविधानिक मूल्यांचे महत्व पटवून देत एड. मिहीर देसाई यांनी मांडले.
तर प्रेमाचं महत्व पटवून देत डोल्फि डिसुझा, म्हणाले कि, द्वेष हा कायमस्वरूपी नाही पण प्रेम हे शास्वत आणि खरे आहे. दुःखी लोकांना, अत्याचारी लोकांना मदत करून, प्रेमाचा संदेश देणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून पूर्ण मुंबईलाच आपण प्रेममय केले पाहिजे.”
तसेच डॉ. सलीम खान म्हणाले कि, “द्वेषाची भिंत पाडण्यासाठी द्वेषाचाच द्वेष करणे गरजेचे आहे. द्वेष रुपी आग पेटवण्यामध्ये सोशल मीडिया महत्वाचं काम करत आहे. म्हणूनच या आभासी दुनियेतून बाहेर पडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कमी करून सत्य माहितीचा शोध घेणे जरुरी आहे. द्वेषरूपी भिंतीला पाडणे खूप कठीण आहे पण अशक्य मुळीच नाही. त्यासाठी आपण सगळे एकत्र येणे खूप गरजेचे आहे.”
या कार्यक्रमाचे संचालन स्टेन्ली फर्नांडीज यांनी केले तर पास्टर त्रिभुवन यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.