Image credit The New Indian Express

04/08/2023

मिथिला राऊत

२४ जून २०२३ रोजी इगतपुरी येथे गोरक्षकांकडून गोमांस वाहतुकीच्या संशयावरून करण्यात आलेल्या मॉबलिंचिंग मध्ये एकाचा मृत्यू तर दुसरा झखमी झाल्याची घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे घडली. (The New Indian Express, 2023). त्या घटनेचा शहानिशा करण्यासाठी ११ जुलै २०२३ रोजी मुंबईतील कुर्ला कुरेशी नगरचे रहिवासी व मोबलिंचिंग मध्ये झखमी झालेले नासीर कुरेशी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.

हि भेट सलोखा संपर्क गटाच्या वतीने आयोजित केली होती, त्यात मुंबईतील रजनीश कोंडविलकर, दलीप जोशी, पुण्यातील प्रमोद मुजुमदार, राष्ट्र सेवा दलाच्या कुर्ला येथील डॉ. अमरीन मोगर आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम च्या मिथिला राऊत यांचा सहभाग होता.

हि मॉब लींचिंगची महाराष्ट्रातील या वर्षात घडलेली दुसरी घटना असून, ८ जून २०२३ रोजी एका टेम्पोवर गुरांची वाहतूक करणाऱ्या तीन जणांवर ‘गोरक्षकांच्या’ गटाने हल्ला झाल्याची घटना देखील नाशिक मधील इगतपुरी येथे घडली. लुकमान अन्सारी (२३) या त्यापैकी एका व्यक्तीचा मृतदेह १० जून रोजी इगतपुरी मधील घाटनदेवी भागात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.  (The New Indian Express, 2023)

नासीर यांनी सांगितल्यानुसार 24 जून २०२३ रोजी, नगरहून म्हशीचे मांस (महाराष्ट्रात कायदेशीर आहे) घेऊन मुंबईच्या दिशेने संध्याकाळी पाच च्या सुमारास नासीर कुरेशी (२७) आणि आफाद अन्सारी (३२)  येत असताना त्यांची गाडी घोटी टोल नाक्याजवळ मिलिटरीचे कपडे घालून बुलेरो गाडीतून आलेल्या काही लोकांनी अडवली. नंतर जवळ जवळ पंधरा ते वीस लोक आले आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली. एवढे पैसे नाहीत पंचवीस हजार आता देतो आणि नंतर धंदा झाल्यावर उरलेले पैसे देतो असे नासीर आणि आफाद यांनी त्यांना  सांगितले. नंतर जमावाने दीड ते दोन लाखांची त्यांच्याकडे मागणी केली. त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, त्या दोघांनाही गाडीतून बाहेर काढले. त्यांच्याकडील 20 ते २५ हजार रुपये काढून घेतले. त्या दोघांचेही मोबाईल काढून घेतले आणि वाहतूक करत असणाऱ्या म्हशीच्या मांसासंबंधित असणारी सगळी कागदपत्रे फाडून टाकली. हा प्रकार घोटी टोल नाक्याजवळ घडला.

आफाद हा म्हशीच्या मांसाचा व्यापारी होता तर नासीर त्याच्या गाडीवर चालक म्हणून दोन दिवसांपासून कार्यरत होता.

नासीर ने सांगितल्या प्रमाणे, त्या दोघांनाही  स्वतःला बजरंग दलाचे लोक म्हणवत असणाऱ्या २० जनांनी हात पाय बांधून चार ते पाच किलोमीटर दूरच्या एका जंगलात घेऊन गेले आणि तिथे त्यांना लोखंडी रॉड, काठ्या, इत्यादी चा वापर करून मारहाण केली. त्यात आफाद ने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला जास्त तीव्रतेने मारले. त्यांना जय श्री राम म्हणण्यास सांगितले. दोघांनाही  जमिनीवर पाडून त्यांच्या डोक्यावर चपलेचे पाय ठेऊन डोकं चिरडले. त्याही पुढे जाऊन घ्रुनास्पद  म्हणजे आफादच्या चेहऱ्या वर त्यातील काही जणांनी मूत्र विसर्जन केल्याचे देखील तो म्हणाला.

एका स्वामीशी ते व्हीडीओ फोन वर बोलत होते समोरून त्या स्वामीने या दोघांनाही मारून टाकण्यास सांगितल्याचे नासीरने ऐकले. या दरम्यान नासीर बेशुद्ध झाला तर अफाद चा मृत्यू झाला. त्या सगळ्यांना वाटले कि दोघेही मरण पावले म्हणून मॉबने त्या दोघांनाही उचलून रस्त्याच्या कडेला आणून फेकून दिले. रात्री पावसाचे पाणी तोंडावर पडल्यामुळे नासीरला शुद्ध आली. रात्री घोटी पोलीस स्टेशन मधील पोलीस तिथे आले त्यांनी दोघांनाही अकराच्या सुमारास नाशिक मधील एसएमबीटी या रुग्णालयात दाखल केले.

नासिरच्या म्हणण्या प्रमाणे त्या पोलिसांनी अपघाताची केस असल्याचे रुग्णालयात सांगितले. तिथे आफाद ला मृत घोषित करण्यात आले. सर्व नातेवाईकांना कळवले गेले. नातेवाईक रुग्णालयात आले. अफाद च्या प्रेताचे पोस्टमोर्टम करण्यासाठी त्याची बॉडी तेथील डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात पाठवली, खरतर त्या रुग्णालयात देखील पोस्टमोर्टम होऊ शकले असते असे नसीर म्हणाला.

पुढे तो म्हणाला ज्या पोलिसांनी अपघाताची केस असं दवाखान्यात खोटे सांगितले होते त्यांना सस्पेंड केले गेले. गाडीतील मांस परीक्षनासाठी फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले गेले. आतापर्यंत अकरा जणांना अटक करण्यात आली असल्याचे देखील तो म्हणाला.

नासिरचे मामू शाहीद कुरेशी म्हणाले कि, नासिरच्या डोक्यात मोठी जखम होती. तरीदेखील एसएमबीटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तो फिट असल्याचे सांगून त्याला एका दिवसातच घरी जाण्यासाठी सांगितले. नासीरला जास्त त्रास होत असल्यामुळे त्याला मुंबईतील कुर्ल्यामधील खासगी दवाखान्यात घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी, त्याच्या डोक्यात खूप मोठी जखम झाली आहे, त्यामुळे मोठ्या रुग्णालयात नेऊन त्याचा सी. टी. स्कॅन करून योग्य तो इलाज करण्यास सांगितले. त्यानंतर परेल येथील के. ई. एम या रुग्णालयात त्याला दाखल केले गेले. तिथे त्याच्या मेंदूचा  सी. टी. स्कॅन केल्यावर समजले कि, त्याच्या मेंदूमध्ये खूप मोठी रक्ताची गाठ तयार झाली आहे. त्याला आय. सी. यु मध्ये ठेवण्यात आले. तो आठ दिवस रुग्णालयात होता. सध्या त्याची स्थिती चांगली असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. नासीरच्या जीवास धोका असल्यामुळे, त्याला कुरेशी एरियाच्या बाहेर जाऊ देत नसल्याचे देखील ते म्हणाले.

या पुढे बोलताना शाहीद म्हणाले कि, या व्यवसायात पैशांसाठी असे हमले सर्रास होतात. त्याची त्यांना सवय देखील आहे. २०१२ – १३  पर्यंत तर बैलाच्या मांसाचा व्यापार व्हायचा तेंव्हादेखील इतका त्रास सहन करावा लागला नाही, जो कि आता म्हशीच्या मांसाचा व्यापार करताना होतो. २०१२-१३ पर्यंत हल्लेखोर पाच हजार रुपयांपर्यंत मागणी करायचे पण आतासारखे जीव घेणे हल्ले होत नसत. गेल्या १० वर्षांमध्ये हल्लेखोर पाच लाखांपर्यंत मागणी करायला लागले आहेत. पूर्वी मारहाण पण इतक्या क्रूरपणे होत नसे. आता खूप वाईट प्रकारे अगदी मारून टाकतात.

बकरी ईद च्या आधी तर खंडणीसाठी व्यापारी पैसे तयार करून ठेवतात. कारण जर मालाच्या गाडीवर हल्ला झाला तर लाखोंचे नुकसान होते. हे नुकसन समजावून सांगताना ते म्हणाले कि, जिवंत मालाची वाहतूक करण्यापेक्षा कापलेल्या मालाची वाहतूक करण्यास जास्त प्राधान्य दिले जाते कारण कापलेला माल छोट्या गाडीत जास्त राहतो. याउलट जिवंत मालास मोठी गाडी लागते व वाहतुकीचा खर्च जास्त येतो. याही पुढे जर जिवंत मालाच्या गाडीवर हल्ला झाला आणि केस कोर्टात गेली तर जिवंत माल देखरेखीसाठी परत मागे पाठवला जातो. एका बकरी, म्हैस मागे जवळ जवळ रु. ५०० किंवा त्याहून जास्त एका दिवसाचा खर्च येतो. तो खर्च केसचा निकाल लागेपर्यंत करावा लागतो त्यात लाखो रुपये खर्च होतात. माल विकत घेतला त्यापेक्षा कितीतरी पटीने खर्च होतो. हा सगळा नसता उपदव्याप टाळण्यासाठी गपगुमान हल्लेखोरांना पैसे दिलेले परवडतात. आणि हे सगळं त्यांच्या अंगवळणी पडल्याचे देखील शाहीद  यांनी नमूद केले.

कुरेशी नगर मध्ये बरेचजण हा व्यवसाय बऱ्याच वर्षांपासून करत आहेत. पण मागच्या काही वर्षांपासून असे जीवघेणे हल्ले होत असल्यामुळे तरुण या व्यवसायात येण्यास घाबरत आहेत. पहिल्यापेक्षा हा व्यवसाय करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. कुर्ला आणि गोवंडी मिळून जवळजवळ चाळीस गाड्या म्हैस, बकर्याच्या मांसाची वाहतूक करतात. करोडोंचा व्यवसाय आहे हा, पण त्यात जोखीम देखील तितकीच आहे असे देखील ते म्हणाले.

दीड ते दोन वर्षांपूर्वी कुर्ल्यातील कुरेशीनगर भागातील रफिक नावाच्या व्यक्तीची इगतपुरी मध्ये अशाच प्रकारे हत्या झाली होती. त्याचे कपडे व चपला सापडल्या पण अद्याप प्रेताचा  ठावठीकाणा लागला नाही व त्याविषयी कुणी चौकशी हि केली नाही  असे देखील शाहीद म्हणाले. या गोष्टीला दुजोरा देत तिथे जमलेले लोक म्हणाले कि रफिक ची पत्नी, तो कदाचित येईल या आशेने आहे व घर चालवण्यासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय करते.

नासीर च्या बाबतीत कायदेशीर कारवाई कशा प्रकारे करत आहात आणि सलोखा तर्फे काय मदत अपेक्षित आहे  असे विचारले असता, शाहीद आणि नासीर व अफाद चे चाचू व तिथे जमलेल्या लोकांनी सांगितले कि, सध्या नासीर च्या जीवास धोका आहे आणि त्यांनी केलेल्या तक्रारीस कोणीच जुमानत नाही. उलट कोर्टात केस गेली तर जास्त वेळ आणि पैसे खर्च होतात. सध्या पोलिसांनीही अर्धीच केस नोंदवली आहे. नासीर आणि आफादला बांधून जंगलात नेले, त्यांना तिथे मारहाण केली, त्यांचे मोबाईल व मांस वाहतुकी विषयीची सगळी कागदपत्रे फाडून टाकली, डॉक्टरांनी देखील नासीरला गंभीर अवस्थतेत सोडून दिले याविषयी केस घेतली नाही. त्यामुळे या बाबतीत सलोखा तर्फे हे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न केले तर बरे होईल असे म्हणाले.

या सगळ्या घटनेवरून मनात प्रश्न येतात कि, शाहीद यांनी नमूद केल्या प्रमाणे हे हल्ले खंडणीसाठी तर होत नसतील ना? हल्लेखोरांना पोलिसांचा अजिबात धाक राहिला नाही का?  त्यात पोलीस तर सामील नसतील ना? लींचिंग ची केस असताना पोलिसांनी अपघाताची केस आहे असे दवाखान्यात का सांगितले असावे? खंडणी वसूल केलेले पैसे कोणाकोणा मध्ये वाटले जात असतील? वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्या गुजरात मधील गोमांस, म्हैस मांस व्यापाराच्या अभ्यासानुसार धर्माच्या नावाखाली मुस्लिमांना लक्ष्य करून हिंदू धार्मिक समुदायातील काही लोक मुस्लीम समुदायातील लोकांमध्ये मॉब लिंचिंगच्या माध्यमातून दहशत निर्माण करतात आणि पैसे कमावतात, हा प्रकार महाराष्ट्रात तर होत नसेल ना? आस्थेचा वापर खंडणीसाठी आणि स्वस्वार्थासाठी तर होत नसेल ना? शाहीद यांनी नमूद केल्याप्रमाणे कुर्ला कुरेशी नगर मधले बरेच लोक घाबरून हा व्यापार करण्याचे कमी झाले तर त्यामुळे म्हशीच्या मांसाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता वाटत नाही का? आणि त्यामुळे या व्यवसायात असणाऱ्या सगळ्याच उद्योगांना व कामगारांना याचा फटका बसू शकत नाही का?

महत्वाचे म्हणजे सगळ्यात स्वस्त प्रोटीन म्हणून उपलब्ध असणाऱ्या या मांसाचा पुरवठा घटला आणि त्यात वाहतुकीचा खर्च वाढला तर दलित समुदायातील व इतर जाती धर्मातील गरीब तपक्यातील लोकांसाठी  ते महागणार नाही का?

 

——————————————–

The New Indian Express. (2023, June 26). Man lynched by ‘cow vigilantes’ on suspicion of transporting beef in Maharashtra; 11 held. The New Indian Express: https://www.newindianexpress.com/nation/2023/jun/26/man-lynched-by-cow-vigilantes-on-suspicion-of-transporting-beef-in-maharashtra-11-held-2588678.html मधून August 2, 2023 पुनर्प्राप्ती

 

Make a donation to support us

Donate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*