Image credit – India Today

मिथिला राऊत

11/07/2024

“ ’नरेंद्र मोदीजी पुरा हिंदु समाज नही है’, ’बीजेपी पुरा हिंदु समाज नही है’’आरएसएस पुरा हिंदू समाज नही है’,” असे १ जुलै रोजी झालेल्या संसदेतील सभे मध्ये राहुल गांधी यांचे उद्गार ऐकावयास मिळाले. खरंतर त्या भाषणात राहुल गांधी यांनी, संसदे मध्ये भगवान शंकर यांचा फोटो दाखवून हिंदु धर्म हिंसेला कसा नाकारतो आणि अहिंसेचा आणि अभयचा (स्वतः घाबरू नका आणि इतरांनाही घाबरवू नका) कशा प्रकारे स्त्रोत आहे हे सांगितले. दुवा मागणारे हात, गुरुनानक, जीजस, यांचा हि फोटो दाखवून तसेच भगवान बुद्ध आणि महावीर यांच्या विषयी बोलतना अहिंसा आणि अभय यांचाच संदेश इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन धर्म देखील देतात हे त्यांनी सांगतले.

खरतर संसदेमध्ये बेरोजगारी, महागाई, शिक्षण, मुलभूत सोयीसुविधा इत्यादी गोष्टींवर चर्चा, त्यावर वाद विवाद होत असल्याचे आपण सर्वसामान्यपणे पाहतो. मग हा धर्माचा विषय राहुल गांधीनी मधूनच कुठून आणला असावा?

थोडासा २०२४ च्या लोकसभा निवडणुक प्रचारावर लक्ष टाकू. सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम च्या अहवालानुसार २०२४ च्या एप्रिल महिन्यात देशात एकूण १७ द्वेष जनक भाषणे देण्यात आली होती.  एकूण सतरा द्वेष जनक  भाषणांपैकी, जास्तीत जास्त अशी दहा भाषणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तीन योगी आदित्यनाथ यांनी, दोन अमित शाह यांनी, एक गिरीराज सिंग यांनी आणि एक मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहेत. हे सर्व भाजपचे मंत्री आहेत (Engineer, Dabhade, & Raut, 2024). या द्वेष जनक भाषणांमध्ये घुसखोर, जास्त मुले असणारे, इत्यादी अशा शब्दांचा प्रयोग केला गेला आहे.

कॉंग्रेस विरोधी प्रचार करताना, २१ एप्रिल २०२४ रोजी राजस्थान मध्ये बांसवाड़ा (Banswara) येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते कि, “पूर्वी, जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार सत्तेत होते तेव्हा त्यांनी म्हटले होते की देशाच्या मालमत्तेवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे. याचा अर्थ, ही मालमत्ता कोणाला वाटली जाईल? ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्यात ते वितरित केले जाईल. ते घुसखोरांमध्ये वाटले जाईल. तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा घुसखोरांकडे जायला हवा का? तुम्हाला हे मान्य आहे का? ही शहरी-नक्षलवादी मानसिकता, माझ्या माता-भगिनींनो, ते तुमचे ‘मंगळसूत्र’ही सोडणार नाहीत. ते त्या पातळीवर जाऊ शकतात. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात माता-भगिनींसोबत सोन्याचा हिशोब करून, त्याची माहिती घेऊन त्या संपत्तीचे वाटप करण्यात येईल, असे म्हटले आहे. ते कोणाला वाटून देतील – मनमोहन सिंग यांच्या सरकारने देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते.” (Times of India, 2024).

तसेच इंडिअन एक्स्प्रेस मध्ये नमूद केल्यानुसार २१ एप्रिल ते १५ मे पर्यंत मोदींनी एकून ६७ भाषणे दिली. त्यात ४३ भाषणांमध्ये राम मंदिराचा उल्लेख केला होता. २३ भाषणांमध्ये मंगळसूत्राचा उल्लेख केला होता. हिंदू-मुस्लीम कमेंट्स, कॉंग्रेसच्या भल्यासाठी संपत्ती वितरण, मुस्लीम वोटे बँक, तसेच एस.सी,  एस. टी, ओबीसींच्या च्या आरक्षणाची लुट हे ६७ पैकी  ६० भाषणांमध्ये आढळले. १७ मार्च ते १५ मे पर्यंत एकूण दिलेल्या १११ भाषांमध्ये १२ वेळा घुसखोर हा शब्दप्रयोग होता. (Das & Malik, 2024)

या विश्लेषणानुसार, भाजप पक्षाच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी विशेषत: पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक विधाने केली आहेत जी भेदभाव करणारी आणि फुटीरतावादी म्हणून ओळखली जाऊ शकतात. लक्षात घेतले पाहिजे कि, अशी भाषणे हानीकारक आणि विभाजित कथनांना योगदान देऊ शकतात आणि सामाजिक एकता आणि विविधतेस हानिकारक ठरू शकतात. तसेच मागच्या काही वर्षांत झालेले सांप्रदायिक दंगे विशेषतः राम नवमीच्या दिवशी झालेले दंगे, जमाव हल्ले, मुस्लीम विरोधी दिली गेलेली भाषणे यावर सरकारने परिणामकाराक कार्याहावी केल्याचे दिसत नाही.

राहुल गांधीनी हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, तसेच जैन धर्म अभयतेची शिकवण देतात, अहिंसेचा संदेश देतात हे संसदेमध्ये  मध्ये सांगण्यामागे, भाजपच्या नेत्यांकडून दिली गेलेली द्वेष जनक भाषणे आणि सांप्रदायिक दंगे आणि धार्मिक रुढींच्या नावावर झालेल्या जमाव हल्ल्यांवर राखलेले मौन, हि तर पार्श्वभूमी नसेल न?

“जो लोग खुदको हिंदु समझते है, वो हिंदु है हि नही” असे भाजपच्या खासदारांकडे बघत राहुल गांधी म्हणाले. त्यात स्पष्ट दिसत होते कि, ते फक्त भाजप आणि हिंदुत्ववादी विचार सारणीच्या लोकांना म्हणत होते.

खरतर एखाद्या धर्मात जन्मास येणे आणि तो धर्म जगणे यात फरक आहे. न्याय, बंधुता, समानता या संविधानिक मूल्यांचे मूळ प्रेम, शांतता, अहिंसा, सौर्हर्द, या धार्मिक मूल्यांमध्ये दिसते. परंतु काही लोक धर्माचे राजनितीकरण करून आपलाच धर्म श्रेष्ठ असे म्हणत, तो धर्म इतरांवर थोपवू पावतात. धर्माला एका विचारधारेशी जोडतात आणि धार्मिक मुल्ये, धार्मिक आचरण बाजूला ठेऊन आपल्या सोयीनुसार नुसार धर्माचा एक शास्त्र म्हणून वापर करतात.  यातूनच मग त्यातूनच युद्ध, दंगली, मॉब लीन्चीग अशा प्रकारची हिंसा होतना दिसते.

खरंतर धर्म, संस्कृती आपल्याला नैतिकता देते जगण्यास उपयोगी पडणारे मूल्य देते. काही वेळा धर्माच्या रूढी परंपरांमध्ये माणसाच्या सोयीनुसार, सामाजिक हितासाठी बदलही होतात. असे बरेच बदल हिंदू धार्मिक रूढी परंपरांमध्ये झालेले दिसतात. मुस्लीम तसेच ख्रिश्चन धार्मिक रूढी परंपरांमध्ये देखील बदल झालेले दिसतात.

हिंदू धर्मामध्ये प्रेमाचा संदेश देणारे आपल्याला साने गुरीजी भेटतात जे म्हणतात “खरातो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे”, त्याच प्रमाणे “हे विश्वाची माझे घर” असे म्हणत संत ज्ञानेश्वर आपणास साऱ्या जगावर प्रेम करण्यास शिकवतात. संत मीराबाई, संत तुकाराम, संत कबीर हे देखील आपल्याला शांतीचा, माणूसकीचा संदेश देतात.

परमेश्वरावरील प्रेम आणि भक्ती म्हणजे काय याचा पंढरीच्या वारीतून प्रत्यय येतो. कोणतेही लालसेपोटी, कोणताही नवस पूर्ण करण्यासाठी नाही, तर फक्त विठ्ठलाच्या मायेपोटी -भक्ती पोटी, विठ्ठलाच्या, संतांच्या नावाचे जप करत २० ते २५ वर्षांपासून दरवर्षी नित्य नेमाने जाणारे लोक पंढरीच्या वारीत दिसतात.

स्वामी विवेकानंद यांनी देखील  बंधुता, स्वीकृती आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला आहे.  ११ सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथील जागतिक धर्माच्या संसदेत स्वामी विवेकानंदांचे हिंदू धर्मावरील प्रतिष्ठित भाषण दिले त्यात ते म्हणाले होते कि “ज्या धर्माने जगाला सहिष्णुता आणि सार्वत्रिक स्वीकृती दोन्ही शिकवल्या त्या धर्माचा मला अभिमान आहे. याच भाषणातील स्वामी विवेकानंद यांची काही वाक्ये खाली नमूद केली आहेत  (Bhalla, 2023)

  • “आम्ही केवळ सार्वभौमिक सहिष्णुतेवर विश्वास ठेवत नाही, तर सर्व धर्म सत्य आहेत हे आम्ही स्वीकारतो.”
  • “सांप्रदायिकता, कट्टरता, आणि त्याचे भयानक वंशज, धर्मंदता, यांनी या सुंदर पृथ्वीवर फार पूर्वीपासून कब्जा केला आहे. त्यांनी पृथ्वी हिंसाचाराने भरली आहे, ती वारंवार आणि अनेकदा मानवी रक्ताने भिजवली आहे, सभ्यता नष्ट केली आहे आणि संपूर्ण राष्ट्रांना निराशेकडे पाठवले आहे.”
  • “ख्रिश्चनाने हिंदू किंवा बौद्ध बनायचे नाही, किंवा हिंदू किंवा बौद्धाने ख्रिश्चन बनायचे नाही. परंतु प्रत्येकाने इतरांच्या आत्म्याला आत्मसात केले पाहिजे आणि तरीही त्याचे व्यक्तिमत्व जपले पाहिजे आणि त्याच्या स्वतःच्या वाढीच्या नियमानुसार वाढू दिले पाहिजे.”
  • “जसे वेगवेगळ्या ठिकाणी आपले स्त्रोत असलेले विविध प्रवाह आपले पाणी समुद्रात मिसळतात, त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, माणसे वेगवेगळ्या प्रवृत्तींमधून जे वेगवेगळे मार्ग स्वीकारतात, ते जरी वेगवेगळे, वाकडे किंवा सरळ असले तरी ते सर्व तुझ्याकडे घेऊन जातात.”
  • “आपण अनावश्यक गोष्टींवर न भांडता आदर्शांचा प्रचार करूया.”(Bhalla, 2023)

महात्मा गांधीनी देखील सत्य हेच ईश्वर आहे म्हटले होते. गांधींच्या मते सत्य म्हणजे ज्ञानार्जन. म्हणजेच ज्या प्रमाणे गलिलिओ ला धर्म गुरूंनी त्याचे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र बद्दल चे ज्ञान जागा समोर ठेवण्यास धर्म गुरूंनी विरोध केला होता, त्यास ते अडथळा झाले होते, त्याप्रमाणे जर ज्ञानार्जन करण्यामध्ये धार्मिक रूढी परंपरा किंवा इतर अडथळे येत असतील तर त्यास पार करून सत्याचा शोध घेणे आणि जागा समोर सत्य ठेवणे यातच ईश्वर आहे.

मुद्दा हा कि धर्म माणसासाठी आहे, का माणूस धर्मासाठी? माणूसच नसेल तर धर्म कुठून दिसेल? धार्मिक विविधता भारताला मिळालेला एक वारसा आहे.  तो जपण्याची आपली जबाबदारी आहे. हि धार्मिक विविधता आपले जीवन समृद्ध करते, आपला दृष्टीकोन विस्तृत करते.

खरतर भारतात वेगवेगळ्या जातीधर्मांचे लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदत आहेत, विविधतेत एकता हा आपला वारसा आहे. इग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंदू, मुस्लीम, शीख अशा विविध धर्मातील लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी संघर्ष केला हे आपणा सर्वांस माहित आहे.

त्यामुळेच कुणालाही धर्माचे भांडवलीकरण करू न देता, आपला विविधतेत एकता हा वारसा जपने, त्याला आणखी समृध्द करणे हे भारताचे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.

References

Bhalla, V. (2023, September 11). 130 years of Swami Vivekananda’s iconic Chicago speech that put Hinduism on world map. Retrieved July 9, 2024, from Times of India: https://timesofindia.indiatimes.com/india/130-years-of-swami-vivekanandas-iconic-chicago-speech-that-put-hinduism-on-world/articleshow/103572808.cms

Das, A., & Malik, S. (2024, May 21). 111 PM speeches: Congress, vikas key themes; ‘4 castes’ find mention, Hindu-Muslim post-April 21. Retrieved July 8, 2024, from The Indian Express: https://indianexpress.com/article/political-pulse/111-pm-speeches-congress-vikas-key-themes-4-castes-find-mention-hindu-muslim-post-april-21-9341452/

Engineer, I., Dabhade, N., & Raut, M. (2024, June 21). Hate Speeches and Spiral of Hatred in the Build up to General Elections in April, 2024. Retrieved July 9, 2024, from csss-isla.comhttps://csss-isla.com/secular-perspective/hate-speeches-and-spiral-of-hatred-in-the-build-up-to-general-elections-in-april-2024/

Times of India. (2024, April 22). Congress will give your wealth to those who have more children : PM Modi in Rajasthan. Retrieved July 8, 2024, from TOI: https://timesofindia.indiatimes.com/india/congress-will-give-your-wealth-to-those-who-have-more-children-pm-modi-in-rajasthan/articleshow/109481173.cms

 

 

 

Make a donation to support us

Donate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*